केरळमध्ये मान्सूनचे आगमन होताच आता राज्यातही मान्सून आला असून मे महिन्यातच राज्यभरात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पावसाचा (Mumbai Rain Updates) जोर मुंबईच्या पश्चिम उपनगरात वाढला आहे. तर दक्षिण मुंबईतही अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला. तर मुसळधार पाऊस आज सकाळी देखील सुरु आहे. जोरदार पावसाने सीएसएमटी, जेजे उड्डाणपूल परिसरात हजेरी लावली. किंग्ज सर्कल परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
आज पहाटेपासून ढग दाटून आल्याने काळोखलेलं वातावरण असून मुंबईकरांना अद्याप सूर्याचे दर्शन झालेलं नाही. ढगाळ वातावरण संपूर्ण मुंबईत असून शहरांसह उपनगरांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Mumbai Rain Updates सकाळी 6 वाजल्यापासून सात वाजेपर्यंत मुंबईत पावसाची झालेली नोंद
नरिमन पॉईंट – 40 मिमी
ग्रॅण्ट रोड – 36 मिमी
कुलाबा – 31 मिमी
भायखळा – 21 मिमी
Mumbai Rain Updates गेल्या 24 तासात मुंबई शहरात 58 मिमी इतक्या पावसाची नोंद
पूर्व उपनगरात 19 मिमी पावसाची नोंद
पश्चिम उपनगरात 15 मिमी पावसाची नोंद
अद्याप कोणत्याही भागात पाणी साचलेले नाही.
पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास अंधेरी सबवे, मालाड सबवे, दहिसर सबवे या सर्व ठिकाणी पाणी भरू शकते. प्रवास करत या भागांतून असाल तर पर्यायी मार्गाचा वापर करा. अधिकृत हवामान खात्याच्या सूचना तपासत राहा. दुचाकी किंवा पादचारी मार्गांनी अनावश्यक प्रवास टाळा अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
Mumbai Rain Updates पुढील 3 दिवस कुठे-कुठे ऑरेंज अलर्ट ?
पुढील 3 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला ऑरेंज’ इशारा आहे. मात्र 29 मेनंतर पावसाचा जोर मंदावेल, असा अंदाज व्यक्त होतोय. दरवर्षी प्रतीक्षा असलेला तळकोकणात मान्सून रविवारी दाखल झाला. मोसमी पाऊस म्हणजेच हवामान खात्याच्या अहवालानुसार मान्सूनची उत्तर सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडपर्यंत पोहोचली आहे. मुंबईत हा मान्सून येत्या तीन दिवसांत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सून तळकोकणात पोहोचल्यानंतर आता तो मध्य अरबी समुद्रासह मुंबईत पोहोचण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार मोसमी पाऊस पुढील तीन दिवसांत मुंबईत दाखल होईल. त्यादरम्यान कर्नाटकसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मान्सून संपूर्ण धडकेल, असा अंदाज आहे. कोकणात सर्वत्र पाऊस पुढील आठवड्यात पडण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर व उपनगरात पुढील दोन दिवस आकाश पूर्ण वेळ ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.