हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पूजनीय मानले जाते. तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप असून भगवान विष्णूची प्रिय आहे. ज्या घरात तुळशीचे रोप असते, त्या घरात सुख, शांती आणि आध्यात्मिक उर्जा नांदते, असे शास्त्रात मानले गेले आहे. मात्र, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची सेवा योग्य पद्धतीने करणे अत्यंत गरजेचे असते, अन्यथा तुळशी सुकते आणि तिचा प्रभाव कमी होतो. चला तर मग, तुळशीची सेवा आणि पूजा करताना कोणते नियम पाळावेत याची माहिती घेऊ.
उन्हाळ्यात तुळशीची सेवा कशी करावी?
उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे अनेकदा तुळशीची पाने वाळतात आणि झाड निर्जीव दिसू लागते. त्यासाठी काही गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्यात. तुळशीला अधिक उष्णता सहन होत नाही. त्यामुळे ती थेट सूर्यप्रकाशात न ठेवता अर्धसावलीत ठेवावी. सौम्य सूर्यप्रकाश लाभेल, अशी जागा निवडावी. तुळशीभोवती अर्पण केलेला लाल रंगाचा कपडा वेळोवेळी बदलावा. उन्हाळ्यात सुती कपडा वापरावा, तो पाण्यात भिजवूनच तुळशीभोवती बांधावा. यामुळे उष्णतेपासून झाडाचे रक्षण होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला पाणी द्यावे. पण सूर्यास्तानंतर पाणी घालणे निषिद्ध मानले जाते. रविवारी व एकादशीला तुळशीला पाणी घालू नये, कारण त्या दिवशी तुळशी व्रत करते असे मानले जाते. झाडाच्या वाढीस अडथळा होऊ नये म्हणून वेळोवेळी वाळलेली पाने आणि फांद्या काढून टाकाव्यात, यामुळे झाडाला योग्य हवा आणि प्रकाश मिळतो. तुळशीच्या आजूबाजूला ओले कपडे वाळवू नयेत, कारण त्यामुळे पांढरे किडे होण्याची शक्यता वाढते. ही किडे झाडाला हानी पोहोचवतात.
पूजाविधी आणि धार्मिक नियम
तुळशीची पूजा नेहमी सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालून करावी.
पूजेमध्ये तुपाचा दिवा लावावा, तुळशी अष्टोत्तर नामावली किंवा चालीसा म्हणावी, आणि तुळशी आरतीने पूजा पूर्ण करावी.
‘ॐ तुलस्यै नमः’ किंवा ‘ॐ विष्णवे नमः’ असे जप करत तुळशीला जल अर्पण करावे.
रविवारी, एकादशी आणि द्वादशीला तुळशीची पाने तोडू नयेत, आणि त्या दिवशी रोपाला स्पर्श करणे देखील टाळावे.
अशुद्ध अवस्थेत किंवा अस्वच्छ हातांनी तुळशीची पूजा किंवा स्पर्श करू नये.
तुळशीला केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर आयुर्वेदातही विशेष महत्त्व आहे. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असतात, ती हवामान स्वच्छ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे घरात तुळशी असणे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही फायदेशीर ठरते.