विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत महायुती सरकराने दिले होते. मात्र हे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर झालेला निधी वारंवार वळवण्यात येत आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करताना दिसतात. याप्रकरणी आता अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. (Ajit Pawar reacted to the diversion of funds from the Ladki Bahin Yojana to other departments)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (06 जून) पुणे दौऱ्यावर आहे. जिल्हा परिषद येथे त्यांच्या हस्ते शिवस्वराज्य दिन आणि कोविड योद्धा स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. अजित पवार यांना लाडकी बहीण योजनेसाठी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा निधी वळवण्यात आल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल प्रतिक्रिया यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. ती तुम्ही ऐकली नाही का? असा प्रतिप्रश्न करत अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री जे बोलतात ते अंतिम असतं. परंतु काहीजण कारण नसताना चुकीची चर्चा करत आहेत. आम्ही सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याच घटकांवर अन्याय करणार नाही. सगळ्यांना न्याय दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar कोणाची तक्रार करायची असेल तर आमच्या सगळ्यांसमोर करा
अजित पवार म्हणाले की, सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला अर्थसंकल्पामध्ये आपण यंदा 39 ते 41 टक्के वाढ करून अधिक निधी दिला आहे. माझं त्यामुळे मंत्र्यांना सांगणं आहे की, कॅबिनेट बैठक असते, त्या व्यासपीठावर अशावेळेला इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा येऊन आपलं मत मांडलं पाहिजे म्हणजे समज-गैरसमज होणार नाहीत. काही जण चुकून बोलून जातात. पण जर कोणाची तक्रार करायची असेल तर आमच्या सगळ्यांसमोर करा, म्हणजे आम्हाला पण कळेल. पण जर का असं केलं नाही तर चुकीच्या बातमी लागतात. अशा बातम्यांना विषय मिळतो आणि मग बातम्या सुरू होतात. पण असं व्हायला नको. कारण एकोप्याने आम्ही कारभार करत आहोत, कुठे भांड्याला भांड त्याच्यामध्ये लागत असेल तर आपण त्यातून मार्ग काढू. पण कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, नागरिकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये याही गोष्टीला वाव देऊ नये, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.