लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये देशातील निवडणुकींसंदर्भात एक मोठा लेख लिहिला आहे. या लेखामुळे देशामध्ये खळबळ उडाली आहे. कारण या लेखात त्यांनी पाच टप्प्यांमध्ये निवडणुकीत करण्यात करण्यात आलेल्या घोटाळ्याचा लेखाजोखा मांडला आहे. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की, सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच, असे खासदार राहुल गांधी यांनी लेखामध्ये म्हटले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समर्थन दिले असून महाराष्ट्राची निवडणूक हायजॅक करण्यात आल्याचे राऊतांनी म्हटले आहे. (Sanjay Raut supports Rahul Gandhi allegations regarding Maharashtra assembly elections)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 7 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्या लेखाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही अमित शहा यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे, अशा पद्धतीने ते लढले. वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या लक्षात आले असेल की, सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर होते. मतमोजणी त्यानंतर थांबविण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरील लाईट घालवण्यात आली. त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला. डाटा उडाला आणि नवीन मशीन आणण्यात आल्या. दिल्लीतून यंत्रणा हलली. वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता. दोन तास या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली, असा दावा राऊतांनी केला आहे.
तसेच, तोच प्रकार महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय राहुल गांधी आणि आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली. निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले. ईव्हीएम मशीनची तर समस्या आहेच. 60 ते 65 लाख मतदान शेवटच्या दोन तासात अचानक वाढविण्यात आले. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे हिंदुस्तानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे जगाला कळले. नरेंद्र मोदी आणि आपल्या सरकारला जगात अपमान सहन करावा लागतोय. हे लोक लोकशाही मानत नाहीत, हे लोक हुकूमशाही प्रवृत्तीने काम करतात. हे लोक निष्पक्ष निवडणूक करत नाहीत. जगात नरेंद्र मोदी आणि देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.