क्रिकेट जगातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सोमवारी एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तर आता तो ऑस्ट्रेलियासाठी टी-20 क्रिकेटमध्ये उपलब्ध राहणार आहे.
ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा एकदिवसीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारताविरुद्ध खेळला होता. त्याने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळजवळ 4000 धावा केल्या असून 79 विकेट घेतल्या आहे. मॅक्सवेल चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये दिसला होता मात्र दुखापतीमुळे काही सामन्यांनंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला.
तर दुसरीकडे आपल्या निवृत्तीबाबात मॅक्सवेलने मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेलीला आधीत कल्पना दिली होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, मॅक्सवेलने सांगितले होते की तो 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळू शकणार नाही.
मॅक्सवेलने फायनल वर्ड पॉडकास्टमध्ये सांगितले की, “मी त्यावेळी त्याला सांगितले होते की ‘मला वाटत नाही की मी हे करू शकेन (2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळेन).’” एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॅक्सवेलने 4 शतके आणि 23 अर्धशतकांसह 3990 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 201 धावा आहे, जो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वकालीन महान खेळींपैकी एक आहे.