एक मोठी बातमी राज्यातील महायुती सरकारमधून समोर आली आहे. (Maharashtra Politics) महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे बोललं जात आहे. अ, ब, क वर्गवारी महामंडळाच्या महत्त्वानुसार करण्यात आली आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला 48 टक्के पदे सर्वाधिक आमदार असल्याने येतील. तर 29 टक्के शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला , तर 23 टक्के राष्ट्रवादीला (NCP) महामंडळ मिळणार आहेत. एकूण 138 महामंडळांमध्ये राज्यात 785 सदस्य संख्या आहे. तर महामंडळांचे वाटप मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री करतील अशी देखील माहिती आता पुढे आली आहे. मंत्रीपदाची वाट पाहणाऱ्या आणि हुलकावणी मिळालेल्या नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदाची ऑफर देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Politics नाराजी दूर करण्यासाठी महामंडळ अध्यक्षपदावर नियुक्ती?
महामंडळ वाटपाची प्रक्रिया महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जवळपास पूर्ण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात येणार आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी राहू नये, यासाठी महायुती सक्रिय झाली आहे. आमदारांनी आता महामंडळ अध्यक्षपदासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नाराज लॉबिंग सुरू केले आहे. या वाटपामुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होऊन आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.
बुधवारी रात्री, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी महायुतीच्या समन्यवय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई, उदय सामंत, तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आदींची उपस्थिती होती. महायुतीच्या समन्वय समितीची आठवड्यातील ही दुसरी बैठक होती.या बैठकीत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. या विजयी मेळाव्याची पोलखोल करण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखण्यात आल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी झालेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचे समजते. अशी स्पष्ट सूचना ‘महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्य टाळा’, सर्वांना दिली. महायुतीमध्ये वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करु नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीमधील (Mahayuti) वाचाळवीर आमदारांना दिली होती.