28.2 C
New York

Eknath Shinde : पुण्यातील भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जय गुजरात

Published:

मराठी भाषा आणि हिंदीसक्ती असा राज्यात वाद गेल्या काही काळापासून रंगला आहे. तसेच मनसेही मराठीबाबत पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ यासह जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर आता वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. या गुजरातच्या उल्लेखावरुन एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. गुजराती समाजाकडून पुण्यातील कोंढवा भागात हे सेंटर उभारण्यात आले आहे. यावेळी भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले भाषणादरम्यान म्हणाले की, “13 वर्षांपूर्वी लोकप्रिय पंतप्रधान मोदींच्या हस्ते या गुजराती भवनाचे या वास्तूचे भूमीपूजन आणि आज लोहपुरूष गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण होत आहे. पंतप्रधान मोदी ज्या ज्या कार्यक्रमांचे भूमीपूजन करतात ते वेगाने पुर्ण होतात. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी वेगळे नाहीत तर मोदींचे प्रतिबिंब अमित शहा आहेत,” असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “गुजराती हे व्यावसायिक, उद्योजक आहेत. गुजरातींशिवाय कोणत्या शहराची शोभा वाढू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गुजराती हा लक्ष्मीपुत्र आहे.” असे ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, या एका घोषणेमुळे उद्घाटन सोहळ्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचीच चर्चा अधिक रंगली आहे. हा केवळ एक सहज उद्गार होता की, यामागे काही राजकीय संदेश दडला होता, यावर आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आगामी काळात या घोषणेचे राजकीय पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img