आज (दि.4) पुणे दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. मात्र, शाहंचा पुणे दौरा सर्व सामान्य आणि चाकरमान्यांसाठी डोकेदुखी (Pune Traffic) ठरला आहे. शाहंच्या दौऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने आणि त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शहरातील सिंहगड रोड आणि अन्य भागांमध्ये सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे अनेकांच्या मनात शाह पुण्यात आले अन् ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ करून गेले अशीच संतापाची भावना होती.
Pune Traffic नोकरदार वर्गाला बसला फटका
पुण्यात पहाटेपासून काही भागात पावसाची रिपरिप सुरू असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहे. त्यात गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर उड्डाणपुलाचेही काम सुरू आहे. त्यामुळे रोजच या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. हा त्रास काय कमी होता त्यात केंद्रीय मंत्र्यांनी आणखी भर टाकली. वाहतूक व्यवस्थेतील बदलामुळे सिंहगड रोड आणि वारजे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांग पाहण्यास मिळाल्या. यामुळे सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला.
राजाराम पुलावर देखील मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. लोक रस्त्यावर जवळपास 1 ते दीड तास अडकून पडले होते. आमित शाह यांचा दौरा एनडीए भागात आहे. पुण्यातील मुख्य रस्त्याची वाहतूक त्यामुळे वळवण्यात आली आहे. सकाळापासून त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.