पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत (Operations Sindoor) भारतीय लष्काराच्या तिन्ही प्रमुखांनी सविस्तर माहिती देत एक-एक कारवाईच्या यशाचा पाढा वाचला आहे. यावेळी ७ मे रोजी आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. आम्ही पाकिस्तानला पाठवलेले ड्रोन नष्ट केले असे एयर मार्शल एके भारती यांनी सांगितले. तर, पाकिस्तानच्या पापांचा प्याला भरला असल्याचे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी यावेळी सांगितले. पहलगाम संपेपर्यंत पापाचा प्याला भरला होता. आम्ही आधीच पूर्ण तयारी केली होती आणि कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी भारताचे सर्व मिल्ट्री बेस आणि सर्व सिस्टम पुढील मिशनसाठी तयार असल्याचे मोठा मेसज वजा इशारा भारताकडून पाकिस्तानला देण्यात आला आहे.
एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. म्हणून, पाकिस्तानने ही लढाई स्वतःची लढाई बनवली, म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. ते पुढे म्हणाले की, भारताच्या हवाई संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणे अशक्य असून, पाकिस्तानने डागलेले चिनी क्षेपणास्त्रही अयशस्वी झाले.
Operations Sindoor पुढील मोहिमेसाठी सर्व यंत्रणा आणि तळ सज्ज
व्हॉइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर बारीक देखरेख ठेवण्यासाठी नैदलाचीही मदत घेण्यात आली. नौदल एकाच वेळी हवाई, भूपृष्ठ आणि भूपृष्ठावरील धोके शोधण्यात सक्षम होते. अनेक सेन्सर्स आणि इनपुटचा प्रभावीपणे वापर करून सातत्याने देखरेख ठेवली जात होती. यामुळे पाकिस्तानकडून करण्यात येणारा प्रत्येक हल्ला निष्प्रभ करण्यात भारताला यश मिळाले. या सर्व कारवायांमध्ये जास्तीत जास्त रडारचा वापर करून ड्रोन आणि लढाऊ विमानांवर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय नौदलाच्या वर्चस्वामुळे हे स्पष्ट झाले आहे की, जर भारताला हवे असेल तर, आपण आपल्या इच्छेनुसार हल्ला करू शकतो. यानंतर एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, भारताचे सर्व लष्करी तळ, उपकरणे आणि यंत्रणा कार्यरत असून, गरज पडल्यास पुढील कोणत्याही मोहिमेसाठी सज्ज आहे.