गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहोचला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला तात्काळ प्रतिसाद देत, हल्ल्याच्या सूत्रधारांना कठोर शिक्षा करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
या पार्श्वभूमीवर, 7 मे रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भव्य आणि निर्णायक मिशन सुरू केले. या मोहिमेंतर्गत भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. सुमारे 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर लाहोर, कराची, रावळपिंडीसारख्या प्रमुख शहरांतील एअर डिफेन्स सिस्टीम्स देखील निष्क्रिय करण्यात आल्या, ज्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे.
या प्रतिउत्तरामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने हमासच्या युद्धशैलीप्रमाणे भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केले. परंतु, भारताची अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आणि तत्पर लष्करी यंत्रणेमुळे हे सर्व हल्ले हवेतच निष्प्रभ ठरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत भारतीय लष्कराला सलाम केला आहे. “या कठीण काळात आपण सर्व सशस्त्र दलांच्या पाठिशी आहोत. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाबद्दल मी त्यांचा कायम ऋणी आहे,” असे तो म्हणाला. त्याच्या या पोस्टवर लाखोंच्या संख्येने प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे आणि चाहत्यांनीही सैन्यदलाचे मनापासून आभार मानले आहेत.
दरम्यान, भारताच्या नौदलाने कराची बंदरावरही हल्ला करून पाकिस्तानच्या समुद्री सुरक्षेवर मोठा आघात केला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारवर दबाव वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.