ओतूर (Otur) ,प्रतिनिधी:दि.७ मे ( रमेश तांबे )
जुन्नर तालुक्यातील जाधववाडी येथे एका चंदन तस्कराच्या क्रेटा कारमध्ये चंदन मिळून आले असून, घटनास्थळावरून चंदन तस्कर हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून,
वनविभागाने दोनशे किलो चंदनासह क्रेटा कार जप्त केली आहे.या कारवाईत पंधरा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
लहु सोमनाथ धुळे रा.मु.जाधववाडी पो.बोरी बु. याच्या विरोधात भारतीय वन अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभाग आरोपी लहू धुळे याचा शोध घेण्यासाठी वनविभागाची चार पथके तैनात करण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री ठोकळ म्हणाले की,दि.६ मे रोजी मु.जाधववाडी पो.बोरी बुद्रुक,ता.जुन्नर येथून चंदन लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांना मिळाली.
त्यानुसार वनवभिगाच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला असता रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संशयित इसम नामे लहू सोमनाथ घुळे हा त्याच्या घरातुन पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीने बाहेर पडला असता त्यास घरासमोरच अटकाव करत गाडीची तपासणी करत असताना लहू धुळे हा अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरुन गाडीची चावी घेऊन फरार झाला.त्यानंतर घटनास्थळी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये चंदन लाकडाच्या तुकड्यांनी भरलेल्या ८ गोण्या एकुण वजन २०१.०५७ किलो ग्रॅम, १ इलेक्टीक डिजीटल वजन काटा, गलोल व अँपल कंपनीचा मोबाईल फोन आणि अवैध वाहतुकीसाठी वापरलेली क्रेटा चारचाकी गाडी असा एकुण रुपये १५ लाख,९५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे,वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ तसेच वनपरिक्षेत्र ओतूर मधील सर्व वनपाल, वनरक्षक इतर कर्मचारी, पोलिस स्टेशन आळेफाटा पोलिस कर्मचारी यांच्या समवेत पार पाडली असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ हे करीत आहेत.