गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील विविध भागांमध्ये आग लागण्याच्या (Mumbai Fire) घटनांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, आता दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात असलेल्या एका इमारतीत सोमवारी (ता. 5 मे) सकाळी आग लागल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी साधारणतः 6.30-7 वाजताच्या सुमारास ही आग लागली. पेडर रोड परिसरात असलेल्या सुखशांती इमारतीला आग लागली. या आगीमध्ये या इमारतीच्या तळमजल्यावर असलेले “लिबास” या ब्रँडेड कपड्याच्या शोमरूमचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Mumbai Fire breaks out in building on Pedder Road, Libas showroom gutted)
मिळालेल्या माहितीनुसार, पेडर रोड परिसरात असलेल्या सुखशांती इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या लिबास शोरुममध्ये सोमवारी सकाळी आग लागली. सकाळी 6.30-7 वाजताच्या सुमारास शोरूममधून धूर येऊ लागल्याने या परिसरातील नागरिकांना याबाबतची माहिती झाली. त्यानंतर तत्काळ या घटनेची माहिती या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी ई. बी. माटले यांनी घटनेची माहिती प्रसार माध्यमांना देत सांगितले की, ही आग सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास लागली. लिबासच्या शोमरूममध्ये ही आग लागली होती. आग लागल्यानंतर इमारतीत वास्तव्यास असणारे लोक खाली येऊ न शकल्याने ते छतावर गेले. 19 लोक छतावर होते. ज्यांना वाचवले आहे. तर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून 5 लोक आणि काही 2 कुत्रे आणि मांजर यांना सुखरूप बाहेर काढले आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ शोमरूम उघडून आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या परिस्थिती सामान्य असून कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याचेही अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आज सकाळी 6.30-7 च्या सुमारास सुख शांती इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या इमारतीत अनेक वृद्ध लोक राहतात, ज्यांना बाहेर काढण्यात आले आहे. तर आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचा तपास करण्यात येत असल्याचे लोढा यांच्याकडून सांगण्यात आले.