10.1 C
New York

Maharashtra Weather : महाराष्ट्रात तापमानाचा उच्चांक

Published:

भारतीय हवामान विभाग आणि सोबतच प्रादेशिक हवामान (Maharashtra Weather) विभागाकडून राज्यातील विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण सोबतच आता राज्यातील तापमानाच्या पाऱ्यानेही उच्चांक गाठल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर वाढत्या उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही सोलापूर आणि अकोल्यात करण्यात आली आहे. (Temperature reaches record high in Maharashtra)

वाढत्या उकाड्यापासून नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा, असा सल्ला हवामान विभाग आणि आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. पण राज्यात सूर्य आग ओकत असल्याने नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरू लागले आहे. परंतु, सध्या लग्नसराई सुरू असल्याने आणि नागरिकांना कामालाही बाहेर जावे लागत आहे. राज्यात सोलापूर, अकोला आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर 44.2 अंश, अकोल्यात 44.5 अंश, नंदुरबार जिल्ह्यात 43.4 एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात आज कमाल तापमानासह किमान तापमानही सर्वाधिक नोंदवले जात आहे. सोलापुरात 30 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे.

पुणे आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्याने 40 अंशांचा आकडा पार केला आहे. पुण्यात 41.2 अंश, नाशिकमध्ये 40 अंश तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 42 अंशांची नोंद करण्यात आली आहे. आज राज्यभरात अतिउच्च तापमान नोंदवले जात असून नागरिकांना उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. मुंबई शहर आणि उपनगराचा पाराही 30 अंशाच्या पार गेला आहे. शहरामध्ये 34 अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून उपनगरामध्ये 33.9 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना अवकाळी पावसासोबतच वाढत्या तापमानाची चिंताही सतावू लागली आहे. तर विदर्भात अवकाळी पावसाचा हायअलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोलीमध्ये यलो अलर्ट व भंडारा, गोंदिया व चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img