महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली ‘शिवभोजन थाळी योजना’, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेला आनंदाचा शिधासारखी योजना बंद करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर आर्थिक बोजा पडत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारकडून हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, गरिबांसाठी सुरू असलेल्या या योजना एकनाथ शिंदे मंत्री असतानाच सुरू करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी या योजना बंद होऊ नये, याकरिता आवाज उठवला पाहिजे, अशसा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. (Sanjay Raut advice to Eknath Shinde on issue of discontinued schemes)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 11 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बंद होणाऱ्या योजनांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे या सरकारचे भाग आहेत. लाडका भाऊ असेल, आनंदाचा शिधा असेल किंवा अन्य काही योजना असतील याच सरकारच्या काळात त्या योजना सुरू झाल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून ज्या योजना सुरू केल्या, त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या योजना बंद करत आहेत. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आहेत. या विषयावर एकनाथ शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे, असा सल्ला यावेळी राऊतांनी दिला. तसेच या गरिबांच्या योजना बंद करण्याचे कारण काय? असा सवालही खासदार राऊतांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांना मोठा धक्का,सोयाबीन खरेदीला मुदतवाढ नाहीच
तर, शिवभोजन थाळी ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेली योजना आहे. ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते. त्या योजनेचे एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी उद्घाटन केले. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योजना बंद करण्याचे प्रश्न विचारले पाहिजे. गरिबांच्या योजना का बंद होतात? आणि अदानीच्या योजना का चालू राहतात हे त्यांनी पाहायला पाहिजे, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राऊतांनी दिलेल्या सल्ल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांचे मंत्री काही उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.