यंदा अमित ठाकरे माहीम मतदारसंघात मैदानात आल्यानं तिरंगी लढत होणार आहे. आमदार सद सरवणकर हे माघार घेतील, असं वाटत होतं. सरवणकर यांनी मात्र, माघार न घेतल्यानं सदा सरवणकर शिवसेनेचे ( शिंदे गट ) विरुद्ध माहीममध्ये शिवसेनेचे ( ठाकरे गट ) महेश सावंत (Mahesh Sawant) आणि मनसेचे अमित ठाकरे, अशी लढत होणार आहे. मात्र, अमित ठाकरे यांच्यावर आता महेश सावंत यांनी निशाणा साधला आहे.
अमित ठाकरेंना राजकारणातलं काही कळतं का? तो बालिश आहे, असा शब्दांत महेश सावंत यांनी टार्गेट केलं आहे. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभादेवीत अमित ठाकरेंच्या प्रचारभेवेळी केलेल्या वक्तव्यांनाही महेश सावंत यांनी उत्तर दिली आहेत. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
‘अमित राज ठाकरे, असं जरी नाव असले, त्याला भेटण्यासाठी तरी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही,’ असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. महेश सावंतत्याबद्दल प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “देशात वक्तव्य करायला स्वातंत्र्य आहे. ज्याला बोलायचं त्यांना बोलुदे. जनता सुज्ञ आहे. जनतेला माहिती, कोण भेटते. आमची आणि त्यांचीही ( राज ठाकरे ) सभा बघा. सभेत भाडोत्री कोण आणि स्थानिक कोण? हे चेहऱ्यावरून ओळखू येते.”
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी खून प्रकरण, शूटर शिवकुमारला अटक
बाळासाहेब हयात असताना शिवसेना सोडली आणि काँग्रेसच्या तिकीटावर महापालिका निवडणूक लढली, असं म्हणत राज ठाकरे यांनी महेश सावंत यांच्यावर निशाणा साधला होता. यावर प्रश्न विचारल्यावर महेश सावंत यांनी म्हटलं, “माणसाचा कधीतरी अपघात होतो. मात्र, तुम्ही तेव्हाचीही माझी क्लीप काढा. माझी मान खाली होती, ती वरती आलीच नाही. मी रात्रभर गिरगाव चौपाटीवर रडत होतो. शिवसेना आमच्या हृदयात आहे. ती हृदयातून जाणार नाही.”
“अमित ठाकरेंना राजकारणातलं काही कळतं का? तो बालिश आहे. अमित ठाकरेंचा जन्म झाल्यापासून राजकारणात आहेत. सचिन तेंडूलकर प्रमाणे त्याचा मुलगा क्रिकेटचा देव झाला का?” असा सवाल उपस्थित करत महेश सावंत यांनी अमित ठाकरेंवर टीका केली आहे.