13.2 C
New York

 Sanjay Raut : …ते विसरू नका; राऊतांचा शिंदेवर निशाणा

Published:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे एकमेकांवर सडकून टीका शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हे करत आहे. उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करताना निशाणा साधताना म्हटले की, काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते, अशा शब्दात त्यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut hits back at Eknath Shinde’s criticism of Uddhav Thackeray)

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टिकेसंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना स्वत:ला ट्वीट करता येतं का? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, आम्ही त्यांना चांगलं ओळखतो. ट्वीट करायला माणसं ठेवली आहेत, त्यांना त्यांनी नीट ट्रेनिंग द्यावे. तसेच कटोरे घेऊन दिल्लीच्या आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षांपासून कोण आहे? उद्धव ठाकरेंचं काय असेल ते आम्ही पाहू, पण गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी मोदी-शहांची धुणी-भांडी करायला कोण गेलं होतं? मुख्यमंत्रीपदासाठी तुम्हीच गेला होता ना? असा प्रश्नांचा भडीमार राऊतांनी केला.

मोदी-शहांच्या उंबरठ्यावरचं तुम्ही पायपुसणं आहात, असे म्हणत संजय राऊत म्हणाले की, ज्या दिवशी मोदी-शहांचा तुमच्या डोक्यावरचा हात जाईल, त्या दिवशी तुमची किंमत या महाराष्ट्रात कचऱ्याइतकी राहणार नाही. या ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही या पदावर पोहचला आहात मिस्टर शिंदे, हे लक्षात घ्या. ठाकरेंवर बोलताना आपलं पूर्वायुष्य काय होतं ते विसरू नका. तुम्ही वारंवार आपल्या भाषणातून व्यक्त केलेलं आहे. खरं तर आपण गुलाम आहात गुजरातच्या व्यापारी मंडळाचे, अशी सडकून टीका राऊत यांनी केली.

संजय राऊतांचं निवडणुकीआधी ‘हे’ विधान चर्चेत

Sanjay Raut शिंदे गटाने सुरतमध्ये दसरा मेळावा घ्यावा

दरम्यान, शिंदे गट दसरा मेळावा घेणार आहे. माझी त्यांना विनंती आहे की, मुंबईत घेऊ नका. तुमची दसरा मेळाव्याची जागा कुठे आहे? तर सुरत. जिथे तुमच्या पक्षाचा जन्म झाला. त्यांचा पक्षाला आता अडीच वर्ष झाले आहे. त्यामुळे दोन ठिकाणी त्यांचा दसरा मेळावा घेऊ शकतात. एक म्हणजे सुरत, कारण त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतमध्ये झाला होता. दुसरं म्हणजे गुवाहाटी. जिथे कामाख्य मंदिरासमोर जिथे ते लोक एक महिन्यापर्यंत थांबले. त्यामुळे त्यांचा दसरा मेळावा, सुरत नाही तर गुवाहाटीमध्ये व्हायला पाहिजे. पण सुरत सर्वात चांगलं आहे, कारण त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतमध्ये झाला आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

दरम्यान, रविवारी (29 सप्टेंबर) नागपुरातील रामटेक येथील सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. याचपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत, हे पुन्हा एकदा सिध्द झालंय. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते. वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही, असे जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img