19.1 C
New York

Moon Mission : चंद्रालाच लागलंय ‘चीन’चं ग्रहण; ‘हिलियम’ पृथ्वीवर आणण्याचा प्लॅन होतोय रेडी

Published:

आता चंद्रालाही चीनचं ग्रहण लागलं आहे. तु्म्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आता जी बातमी आली (China) आहे त्यावरून तरी असंच वाटत आहे. चीनने चंद्रावरील हिलियम (Moon Mission) काढण्यास सुरुवात केली आहे इतकेच नाही तर हिलियम पृथ्वीवर आणण्याचा प्लॅनही रेडी केला आहे. यासाठी चीनचे वैज्ञानिक चंद्राच्या पृष्ठभागावर एक मॅग्नेटिक लाँचर लावण्याची तयारी करत आहेत. लाँचर अशा पद्धतीने लाँच केले जाईल ज्यामुळे हिलियम 3 आणि अन्य मूल्यवान धातू पृथ्वीवर आणता येऊ शकतील.

आता ऐकताना ही गोष्ट थोडी चमत्कारिक वाटते. एखाद्या सायन्स फिक्शन पिक्चरसारखे वाटते पण चीनी वैज्ञानिक ही गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेटिक लाँचर स्थापित करून अवकाशात खनन क्रांती आणणार आहे. पृथ्वीवर सध्या जे ऊर्जेचं संकट निर्माण होत आहे त्यावर मार्ग काढण्यात हा पर्याय ठरू शकतो असे चीनला वाटत आहे.

Moon Mission कसे असेल मॅग्नेटिक लाँचर

चीनी वैज्ञानिक ज्या मॅग्नेटिक लाँचरवर काम करत आहेत त्याचं काम चंद्राच्या पृष्ठभागावरून कार्गोला पृथ्वीवर पाठवण्याचं असणार आहे. यासाठी 1 हजार 510 अब्ज डॉलर्सचं बजेट निश्चित करण्यात आलं आहे. म्हणजेच या मिशनसाठी चीन पाण्यासारखा पैसा खर्च करणार आहे. चंद्राच्या जमिनीवर एक 50 मीटरची रोटेटिंग आर्म (फिरते यंत्र) बनवले जाणार आहे. जवळपास 165 फूट लांब यंत्र आपल्या जागेवर त्याचा वेग 2.38 किलोमीटर प्रति सेकंद होत नाही तोपर्यंत फिरत राहिल. 8568 किमी प्रति तास वेग झाल्यानंतर यंत्र एक कॅप्सूल पृथ्वीकडे टाकील. यामध्ये चंद्रावर खोदकाम करून मिळालेले हिलियम आणि अन्य ऊर्जा असेल.

चंद्रावरील वातावरण अनोखे आहे. पृथ्वीपेक्षा एकदम वेगळे वातावरण येथे आहे. अशा वातावरण लाँचर एक वेगळा प्रयोग ठरू शकतो. चंद्रावर गुरुत्वाकर्षण आजिबात नाही. चंद्राचे कोणते वायूमंडळही नाही. अशा परिस्थितीत लाँचरचे रोटेटिंग आर्म आपल्या वेगापर्यंत सहज पोहोचू शकते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या यंत्राला चालू करण्यासाठी सौर आणि परमाणु ऊर्जेचा वापर केला जाईल.

Moon Mission ऊर्जेचा सुरक्षित पर्याय हिलियम

चंद्रावरील हिलियम 3 हा वायू पृथ्वीवर आणण्यासाठी लाँचर स्थापित करण्याची योजना चीन तयार करत आहे. हिलियम 3 पृथ्वीवर अतिशय कमी प्रमाणात आहे. चंद्रावर मात्र मुबलक प्रमाणात हिलियम 3 उपलब्ध आहे. भविष्यातील इंधन म्हणून हा मोठा पर्याय ठरू शकतो. हिलियम 3 हा इंधनाचा सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ पर्याय ठरू शकतो.

चीनच्या संशोधकांच्या मते फक्त 20 टन हिलियममुळे अख्ख्या चीनला एक वर्षापर्यंत वीज मिळू शकते. पृथ्वीवर आजमितीस हिलियम 3 फक्त 0.5 टन आहे. तर चंद्रावर तब्बल 1 मिलियन टन पेक्षा जास्त हिलियम असू शकतो. जर हा हिलियम पृथ्वीवर आणता आला तर एक हजार वर्षांपेक्षा जास्त काळ अख्ख्या जगाची ऊर्जेची गरज मिटू शकते.

Moon Mission कसं काम करणार लाँचर

मॅग्नेटिक लाँचर एक प्रकारे हॅमर थ्रो पद्धतीने काम करेल. सोप्या शब्दांत सांगायचं तर एखादा अॅथलीट थ्रो करण्याआधी हॅमर गोल फिरवतो त्या पद्धतीनेच लाँचर काम करणार आहे. लाँचरच्या नजरेनं पाहिलं तर याचा रोटेटिंग आर्म चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर येण्याइतकी गती मिळेपर्यं फिरत राहिल.

रोटेटिंग आर्म सुपर कंडक्टिंग मोटारीने चालेल. यामध्ये चंद्रावरील संपत्तीने भरलेले कॅप्सूल असतील. रोटेटिंग आर्म वेगाने फिरायला लागल्यानंतर साधारण दहा मिनिटांत 2.38 किलोमीटर प्रति सेकंद या स्पीडपर्यंत पोहोचेल. निश्चित वेगात पोहोचल्यानंतर चंद्रावरील संसाधनांनी भरलेले कॅप्सूल लाँच करेल.

चीनची ही योजना यशस्वी होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. कारण यामध्ये काही समस्याही आहेत. चंद्राचा ओबडधोबड पृष्ठभाग ही एक मोठी समस्या आहे. यामुळे लाँचर स्थापित करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच या सिस्टिमला चंद्रावरील कठीण हवामान सहन करण्याइतपत सक्षम बनवावे लागणार आहे. 2030 पर्यंत लाँचरचे प्रमुख घटक गोळा करून पुढे 2045 पर्यंत चंद्रावरून नैसर्गिक संपत्ती प्रत्यक्षात आणण्याचे काम सुरू करता येईल.

आजमितीस चीन अंतराळ संशोधनाचे एक मोठे केंद्र बनला आहे. चीन प्रमाणेच अमेरिकाही चंद्रावरील ही नैसर्गिक संपत्ती पृथ्वीवर आणण्याचा विचार करत आहे. दोन्ही देशांच्या स्पेस एजन्सींप्रमाणेच खासगी क्षेत्रातील कंपन्या सुद्धा सातत्याने चंद्र मोहिमा लाँच करत आहेत. आर्टेमिस मिशनच्या माध्यमातून नासा चंद्रावर एक कॉलोनी बनवण्याची योजना आखत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img