पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतावर (Pakistan News) पाकिस्तान सरकारकडून सातत्याने अन्याय केला जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा सरकारवरील रोष वाढत चालला आहे. बलोचिस्तानच्या शिक्षण विभागाने पाकिस्तान सरकारच्या आणखी एका (Balochistan) अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. शिक्षण विभागाच्या या अहवालानुसार बलोचिस्तानमध्ये तब्बल 3 हजार 694 सरकारी शाळा बंद पडल्या आहेत.
बलोचिस्तान पाकिस्तानमधील नैसर्गिक साधन संपत्तीने भरपूर असलेले राज्य आहे. परंतु राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे या राज्याचा विकास खुंटला आहे. यातच आता बलोचिस्तानच्या शिक्षण विभागाच्या या अहवालाने मोठी खळबळ उडाली आहे. बलोचिस्तामधील 35 जिल्ह्यांतील तीन हजारांपेक्षा जास्त सरकारी शाळांना टाळे लागले आहे. यावरुन पाकिस्तानमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या सरकारने कारभार हाती घेतल्यापासून 542 शाळा बंद झाल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार 2 सप्टेंबरपर्यंत राज्यात एकूण 3 हजार 694 शाळा बंद झाल्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षकांची प्रचंड कमतरता होती. यामुळेच या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे.
बलोचिस्तान असेंबलीच्या एका सदस्याने शिक्षण मंत्रालयाकडे याबाबत माहिती घेतली होती. यानंतर हा सदस्य गैरहजेर राहिल्याने लेखी उत्तर असेंब्लीमध्ये सादर करता आले नाही. आता पुढील बैठकीत हे लेखी उत्तर असेंब्लीमध्ये सादर केले जाईल. बलोचिस्तानच्या शिक्षण विभागाने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सध्या संपूर्ण प्रांतात 15 हजार 096 सरकारी शाळा आहेत. यामध्ये 48 हजार 841 शिक्षक मुलांना अध्यापनाचे काम करत आहेत. आता ज्या शाळा बंद केल्या आहेत त्या पुन्हा सुरू करण्यासाठी 16 हजार शिक्षकांची आवश्यकता आहे.
मणिपुरात परिस्थिती गंभीर! इंटरनेट ठप्प, संचारबंदी लागू
Pakistan News 12 लाखांपेक्षा जास्त मुले शिक्षणापासून वंचित
शिक्षण विभागाच्या रिपोर्टनुसार सन 2021 पर्यंत येथील तब्बल 12 लाख मुलांना शाळा सोडावी लागली. 2021 पर्यंत शाळांमध्ये सात हजार शिक्षकांची कमतरता होती. आता ही संख्या 16 हजारांपर्यंत पोहोचली आहे. याच पद्धतीने बंद होणाऱ्या शाळा आणि शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा पाकिस्तान सरकारकडून कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत.
बलोचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांच्या गृहक्षेत्र डेरा बुगतीमध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांअभावी 13 शाळा बंद पडल्या आहेत. आता येथील स्थानिक सरकारने शिक्षकांच्या भरतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात 9 हजार 496 पदांच्या भरतीसाठी नियोजन सुरू केले आहे. आता या शाळा पुन्हा सुरू होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.