दीपक काकरा, जव्हार
जव्हार : (Jawhar) ग्रामीण भागातील समस्या सोडवून शासकीय योजनेच्या मदतीने सर्वांगीण विकास साधायचा असेल तर तळपातळीवरून कामाला सुरुवात व्हावी, हा उद्देश ठेवीत नुकतेच जव्हार तालुक्यातील जुनी जव्हार ग्रामपंचायतद्वारे घरोघरी विकासाची गंगा अशी युक्ती योजित काम सुरू केले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासन, सरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, त्या भागातील आरोग्य, शिक्षण, अशी यंत्रणा घेऊन सरपंच आपल्या दारी असा आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिबिराचे आयोजन करून एका दिवसात सर्वांना अपेक्षित कागदपत्र व शासनाच्या योजनाचा लाभ घेता येणार आहे.
नवनिर्वाचित सरपंच निलेश भोये यांनी सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, अशिक्षित, निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या, भूमिहीन यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना येणाऱ्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. त्यांचबरोबर प्रत्येक कुटुंबाची संपूर्ण माहिती संकलित करून ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पावसाच्या तडाख्याने मराठवाड्यात 12 मृत्यू; 5 लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त..
ग्रामपंचायत हद्दीतील निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या महिला, तसेच ६५ वर्षांवरील प्रौढ आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजना असूनही अशिक्षितपणा, गरिबी आणि वारंवार शासन दरबारी माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांमुळे ते योजनांपासून वंचित आहेत. अशा कुटुंबांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी, कुपोषण, वीज यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष वेधले आहे.
दैनंदिन जीवनात नागरिकांना येणाऱ्या समस्या समजून घेऊन, त्या-त्या कुटुंबाची आकडेवारी काढून ग्रामपंचायत स्तरावर योग्य नियोजन करून अडचणी, समस्या, शासन दरबारी मांडून गरीब, गरजूंना आधार मिळेल. त्यातूनच मागासलेल्या कुटुंबाचा विकास साधला जाईल, असे ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने सांगितले. यावेळी उपसरपंच संजय भोये, ग्रामसेवक संदीप घेगड, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, युवा आदिवासी संघ अध्यक्ष राजू भोये, लकी भोवर, महादू भुसरा, यशवंत महाले, राजेश भोये, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता, रोजगार सेवक, परिचारिका, सरकारी कर्मचारी, गावातील तरुण, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या. रोजगार सेवक, एमपीडब्ल्यू प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका यांनी प्रत्येकाच्या दारी जाऊन त्यांना येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. संकलित माहितीच्या आधारे ज्या लोकांकडे आधारकार्ड, जातीचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, वनपट्टा नाही, तसेच जे अपंग, निराधार, विधवा, परितक्त्या, महिला शासनाच्या लाभापासून वंचित आहेत. यासाठी शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत जुनी जव्हार कार्यालयात केले आहे. जेणेकरून एका दिवसात सर्वांना अपेक्षित कागदपत्र व शासनाच्या योजनाचा लाभ घेता येईल.