राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केल्याने आज मुंबईतील वरळी डोम येथे मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून विजयी मेळाव्याचा आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, दादर पोलिसांनी (Dadar Police) विजयी मेळाव्यापूर्वी पालघर येथील काही मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे. मात्र पालघर येथील मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं ? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीवरुन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती नको या मागणीसाठी 5 जुलै रोजी ठाकरे बंधू मोर्चा काढणार होते मात्र राज्य सरकारने जीआर रद्द केल्याने आज ठाकरे बंधूंकडून वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यातून ठाकरे बंधू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या मेळाव्यात कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये, असे आवाहन दोन्ही पक्षाकडून करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. वरळी डोममध्ये आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठीचा आणि आवाज ठाकरेंचा असे बॅनर लावण्यात आले आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटात युतीबाबात या मेळाव्यात घोषणा होणार का? आज ठाकरे बंधू कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.