20.1 C
New York

Sanjay Raut : आमच्यासाठी बडगुजर हा विषय संपला, आऊटगोइंगच्या मुद्द्यावरून राऊतांचे स्पष्ट मत

Published:

नाशिक जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बडगुजर यांनी सोमवारी (ता. 2 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे त्यावेळी बडगुजर यांनी म्हटले होते. पण बुधवारी (ता. 4 जून) पक्षविरोधी काम केल्याने बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर पक्षातून सुरू झालेल्या आऊटगोइंगच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा रंगल्या. त्यामुळे आता याच आऊटगोइंगच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. बडगुजर हा विषय आमच्यासाठी संपला आहे, त्यामुळे पक्षातले आऊटगोईंग वगैरे शब्द बंद करा, असे राऊतांकडून सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut clearly spoke on issue of outgoing, saying that topic of Sudhakar Badgujar has been closed for us)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 5 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पक्षातून होणाऱ्या आऊटगोइंगबाबत विचारणा करण्यात आली. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, अशा शब्दांच्या उपमा देऊ नका. मी आधीपण सांगितले आहे की, दोन तास आमच्याकडे ईडी, सीबीआय, पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा 90 टक्के आऊटगोईंग करेल. याला वैचारिक पक्षांतर वगैरे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कोणाला जायचे आहे, कोणाला थांबायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण पक्षात राहून जर कारवाया कराल तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल, असे राऊतांनी स्पष्ट सांगितले.

तसेच, बाळासाहेब ठाकरे यांची, उद्धव ठाकरे यांची ही शिवसेना आहे आणि ही शिवसेना कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. देशाच्या राजकारणातला हा बराच जुना पक्ष आहे. भले अमित शहांनी त्यांचा कंडू शमवण्यासाठी, महाराष्ट्रावर त्यांना जो सूड उगवायचा आहे, त्यासाठी शहांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला. पण शिवसेना काय आहे ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. इनकमिंग-आऊटगोईंग किंवा अजून कोणतेही शब्द वापरत असाल तर त्या शब्दांचा वापर जपून करा, पक्षांतर्गत कोणतेही हेवेदावे, ब्लॅकमेलिंग, दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही, असे यावेळी राऊतांनी सांगितले.

ही विचारपूर्वक झालेली कारवाई…

पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते, त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसांत तसेच स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतरच अशा प्रकारची कारवाई केली जाते. त्यामुळे आता बडगुजर हा विषय आमच्यासाठी संपला आहे, असे सांगत बडगुजर यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईबद्दल अधिक बोलण्यास राऊतांनी नकार दिला. चुकीचे काम आमच्याकडून होत नाही, असेही राऊतांनी सांगितले. मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष हेच धोरण शिवसेनेत कधीच राबवले जात नाही, असेही यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img