खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तुरुंगात जाता जाता वाचले असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या नरकातला स्वर्ग (Narkatla Swarg) या पुस्तकातून केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असताना संजय राऊतांनी या पुस्तकाचं लिखाण केलंय. अनेक दिवस तुरुंगात असताना संजय राऊत या पुस्तकाचं लिखाण करीत होते.
आज अखेर हे पुस्तक प्रकाशित झालं असून यामध्ये तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना कशी मदत केली? याचा उल्लेख राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांच्या खळबळजनक दाव्यामुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये दंगल घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अटक होण्याची शक्यता होती. तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी म्हणून मोदी आणि अमित शाहांना अटक होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीमुळे नरेंद्र मोदी यांना अटक झाली नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
गोध्राकांड प्रकरणात सीबीआयकडून अनेक चौकश्यांचा ससेमिरा मागे लागलेला होता. त्यावेळी केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं, आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. गुजरातमधील अनेकांना या दंगल प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. या प्रकरणी चौकशीची आणि कारवाईची सुई ही आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत वळली होती. यावेळी शरद पवार यांनी रोखठोक भूमिका घेत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करु नये, असं म्हटलं होतं. शरद पवार यांच्या भूमिकेला कॅबिनेटमध्ये मूकसंमती मिळाली होती. शरद पवारांच्या या भूमिकेमुळेच नरेंद्र मोदी यांची अटक टळली होती, असा दावा संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केला आहे.
या प्रकरणात अमित शाह यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनाही फोन केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी सुत्र हलवली होती. आजमितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्या उपकारांचे किती स्मरण ठेवले आहे? असा खोचक सवालही खासदार संजय राऊत यांच्याकडून विचारण्यात आला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी तुरुंगात असताना नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं लिखाण केलंय. या पुस्तकातून त्यांनी देशाच्या राजकारणातील अनेक गुपितं उघडं केली आहेत. हे पुस्तक मी जुलमी शासनव्यवस्थेला बळी पडलेल्या जगातील सर्वच राजकीय कार्यकर्त्यांना अर्पण करीत असल्याचं संजय राऊतांनी पुस्तकात म्हटलंय.