भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor)नंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमुळे दोन नावं विशेषतः चर्चेत आली — त्यातील एक म्हणजे विंग कमांडर (Wing commander) व्योमिका सिंह (Vyomika Singh). भारतीय वायुसेनेतील प्रतिष्ठित अधिकारी असलेल्या व्योमिका सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाच्या संरक्षण यंत्रणेमध्ये एक खास स्थान निर्माण केलं आहे. २०१९ साली त्यांना भारतीय वायुसेनेत कायमस्वरूपी कमिशन मिळालं. त्या केवळ एक पायलट नसून एक प्रेरणास्थान देखील आहेत. २०२१ मध्ये हिमाचल प्रदेशातील २१,६२५ फूट उंच माउंट मणिरांग शिखर सर करणाऱ्या ‘ट्राय-सर्व्हिसेस’ मोहिमेचा त्याही एक भाग होत्या. या मोहिमेचे नेतृत्व विंग कमांडर भावना मेहरा (Bhavna Mohra) यांनी केलं होतं.
एका मुलाखतीत व्योमिका यांनी सांगितले की त्यांच्या पायलट होण्यामागची प्रेरणा शालेय जीवनात मिळाली होती. सहावी-सातवीच्या काळात एकदा त्यांच्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना आपापल्या नावाचा अर्थ विचारला. त्यावेळी व्योमिका यांनी ‘व्योम’ म्हणजे ‘आकाश’ असं सांगितलं. त्यावर एका वर्गमित्राने थट्टेने विचारलं, “मग तू काय, अवकाशाची राणी आहेस का?” हा प्रश्न त्यांच्या मनात खोलवर घर करून गेला. त्याच क्षणी त्यांनी ठरवलं — आपण आकाशावर राज्य करायचं आणि पायलट व्हायचं! आज त्या बालपणी घेतलेल्या निर्धाराला साकार करून, भारताच्या वायुसेनेत एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
व्योमिका सिंह या केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत, तर नेतृत्वगुण, धाडस आणि आत्मविश्वास यांचेही प्रतीक आहेत. त्यांच्या सारख्या महिला अधिकारी आजच्या युवतींसाठी आदर्श ठरत आहेत, खासकरून संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी.