‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मन जिंकणारा आणि सर्वसामान्य घरातून झेप घेणारा अभिनेता दत्तू मोरे (Dattu More) आता वडील झाला आहे! दत्तूने आपल्या इन्स्टाग्रामवरुन ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर करत बाळासोबतचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. लग्नानंतर दोन वर्षांनी दत्तू आणि त्याची पत्नी डॉ. स्वाती मोरे यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. एका फोटोमध्ये दत्तू आणि स्वाती बाळाच्या इवल्याशा हाताला हातात घेताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याचा चिमुकला मुलगा दत्तूचं बोट घट्ट पकडलेला दिसतो.
फोटोसोबत दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे –
“Finally… तो आला! We now officially have a tiny human to blame. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण… मी सदैव कृतज्ञ आहे.”दत्तूच्या या पोस्टवर चाहत्यांसह त्याच्या सहकलाकारांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दत्तू आणि स्वाती यांची प्रेमकहाणीही तितकीच खास आहे. एका मित्रामुळे झालेली ओळख, मग फेसबुकवरून संवाद आणि ‘हास्यजत्रा’मधील स्कीट्समुळे निर्माण झालेलं नातं शेवटी लग्नात परावर्तित झालं. २०२३ मध्ये त्यांनी लग्न केलं आणि आता दोघं एकत्र पालकत्वाचा आनंद अनुभवत आहेत. आता हास्याची जत्रा अधिक गोड झाली आहे कारण दत्तू मोरेच्या आयुष्यात आला आहे एक गोंडस ‘छोटा पाहुणा’!