14.6 C
New York

Uddhav Thackeray : …भाजपाच्या फौजा सीमेवर जाऊन शौर्य दाखवणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

Published:

पाकिस्तानने हल्ला करून आमचे पाच-पंचवीस हिंदू मारल्याशिवाय यांच्या राष्ट्रभक्तीला कधीच फेस येत नाही. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगामचा हल्ला याचे ज्वलंत उदाहरण आहे. हे हल्ले झाले आणि त्यात आमचे जवान, नागरिक मारले गेले तेव्हा दुश्मनांना धडा शिकवायची भाषा केली गेली. दहा वर्षे हे सत्तेवर आहेत. मग या दहा वर्षांत दुश्मनांचा बंदोबस्त करण्यासाठी यांनी काय केले? आणि आताही पाकड्यांचा बदला घेण्यासाठी भाजपाच्या तोंडाळ फौजा सीमेवर जाऊन शौर्य दाखवणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) केली आहे.

पहलगामचा बदला घेऊ, असे पिचक्या मांड्यांवर थापा मारून रोजच सांगितले जात आहे. सिंधू नदीचे पाणी थांबवू म्हणजे पाकिस्तान पाण्याशिवाय तडफडून मरेल, पण हा ‘पाणीबॉम्ब’ इतक्या सहजतेने टाकता येत नाही आणि सिंधूचे पाणी अडवण्यासाठी मोठी धरणे बांधावी लागतील. पण लोकांना मूर्ख बनवायचे, बनवत राहायचे, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारतातील सत्ताधारी पक्षांचा राष्ट्रवादाचा फेस फसफसून बाहेर येत आहे आणि ते इतरांच्या राष्ट्रवादावर, देशभक्तीवर प्रश्न विचारू लागले आहेत. मराठीत यासाठी दोन वाक्प्रचार आहेत; एक म्हणजे ‘चोराच्या मनात चांदणे’ आणि दुसरा म्हणजे ‘खाई त्याला खवखवे’. भाजपा वगैरे पक्षांची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची या लोकांशी व्यापार करणाऱ्यांना तसेच त्यांना आपल्या पक्षात स्थान देणाऱ्यांच्या तोंडी ‘राष्ट्रवाद’ वगैरे शब्द शोभत नाहीत, असे त्यांनी सुनावले आहे.

सध्या भाजपा काळात देशभक्तीचे जे ढोंग वाढले आहे, त्यामुळे देशातील राष्ट्रवादाचा पायाच भुसभुशीत झाला आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात अनेक ‘सेना’ तसेच ‘संघटना’ स्थापन होऊन त्या धर्माच्या नावाने हैदोस घालीत आहेत. या शूरांनादेखील अर्जुन पुत्र अभिमन्यूप्रमाणे शत्रूशी लढण्यासाठी रावळपिंडी, इस्लामाबाद, लाहोर, कराचीला पाठवायला हवे. भारतीय जवान अत्यंत कठीण परिस्थितीत काश्मिरात आणि सीमेवर काम करीत आहेत. मात्र त्यांनाही भारतातील घाणेरड्या राजकारणात ओढले जात आहे, असी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img