19.1 C
New York

CM Eknath Shinde : कोणी ‘माई का लाल’ आरक्षण बंद करू शकत नाही; काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Published:

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये केलेल्या आरक्षणासंदर्भातील विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) वर्ध्यामध्ये बोलताना राहुल गांधी तसेच काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी, “कोणीही ‘माई का लाल’ देशातील आरक्षण बंद करू शकत नाही,” असे ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल स्तुतीसुमने उधळली. (CM Eknath Shinde criticized Rahul Gandhi and Congress over reservation statements)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात उपस्थित जनतेशी संवाद साधताना काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले की, “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगात देशाचा सन्मान वाढवत आहेत. तर, दुसरीकडे आपलेच काही लोकं परदेशात जाऊन आपल्या देशाला बदनाम करतात. आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात. जे आरक्षण आणि संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, त्याला थांबवण्याचा किंवा संपवण्याचा अधिकार कोणालाच नाही. जोपर्यंत पंतप्रधान मोदी आहेत, तोपर्यंत कोणीही ‘माई का लाल’ हे आरक्षण गरीबांपासून ओरबाडून घेऊ शकत नाही.” असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, “काही लोकं म्हणतात की, 370 कलम पुन्हा आणणार. तुम्हाला पुन्हा एकदा दहशतवाद पुन्हा आणायचा आहे का? 370 हटवल्यानंतर काश्मीरचा विकास होत आहे. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या या लोकांना काश्मीरचा विकास रोखायचा आहे का? दहशतवाद्यांशी साटंलोटं करायचे आहे का? ” असे सवाल केले. काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.

काँग्रेस देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष, पंतप्रधान मोदींची टीका

“आता भारताचे 21 वे शतक आहे. मोदी हे देशाचे कर्णधार असून त्यांनी देशातील महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. गेल्या दहा वर्षात 10 कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या. अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू करण्यात येत असून त्यासाठी महिलांना 25 लाखाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. 1 हजार महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विभाग सुरू करत आहोत. तसेच, पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचीही सुरुवात होणार आहे. यामध्ये दोन लाख रोजगार मिळणार असून परिसराचा मेकओव्हर होणार आहे. देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य माणसाचा सन्मान वाढवण्याचे काम करत असून त्यांची ताकदही वाढवत आहेत.” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी स्तुतीसुमने उधळली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img