19.1 C
New York

BJP : स्वबळावर फायदा, युतीत पिछेहाट; महाराष्ट्रात भाजपाचा अजबच ट्रॅक..

Published:

राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर आता महायुतीचं सरकार आहे. या युतीत भाजपसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे (Ajit Pawar) पक्ष सहभागी आहेत. आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Elections) होणार आहेत. या निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे तिन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. यामध्ये जागावाटप भाजपसमोर (BJP) सर्वात मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या मित्र पक्षाची गरज भासतेच. याच अडचणीमुळे म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे म्हणा भाजपला आघाडीचं राजकारण करावं लागत आहे. निवडणुकीत स्वबळावर उतरलं तरी सर्व जागा लढण्याची ताकद भाजपमध्ये नक्कीच आहे. परंतु यावेळी भाजपाला दोन पक्षांना ॲडजेस्ट करावे लागणार आहे. त्यामुळे भाजपला यंदा मोठा त्याग करण्याची तयारी करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

थोडं मागे जाऊन पाहिलं तर 2019 मधील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (Shivsena) एकत्र होते. 2014 मधील निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यंदा मात्र युतीत आणखी एक पक्ष वाढला आहे. निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित लढतील असे नेते सांगत आहेत. जर ही युती शेवटपर्यंत टिकली तर भाजपाला जागावाटपात दोन्ही पक्षांना समाधानकारक जागा द्याव्या लागणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून 110 तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी 70 जागांवर लढण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. जागावाटपात या दोन्ही पक्षांना किती जागा मिळतील हे अजून निश्चित नाही. या दोन्ही मोठ्या पक्षांबरोबर युतीतील अन्य लहान पक्षांचाही विचार करावा लागणार आहे.

BJP भाजपची कामगिरी कशी होती?

राज्यात एकूण 288 मतदारसंघ आहेत. 2019 मधील निवडणुकीत भाजपने 164 जागांवर उमेदवार दिले होते. शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या. तसेच 55 जागांवर दुसऱ्या तर 4 जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मते भाजप उमेदवारांना मिळाली होती. 2014 मधील निवडणुकीचा निकाल पाहिला तर या निवडणुकीत भाजपने 260 मतदारसंघात उमेदवार दिले होते. यांपैकी 122 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय 60 मतदारसंघात दुसऱ्या तर 56 मतदारसंघात भाजप उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता आणि आपला मुख्यमंत्री देण्यातही यशस्वी ठरला होता.

BJP भाजपसाठी फायद्याचं काय?

राज्याच्या राजकारणात एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे भाजपला स्वबळावर लढण जास्त फायद्याचं ठरलं आहे. आघाडी करून लढणं नुकसानीचं ठरलं आहे. 2014 आणि 2019 मधील निवडणुकीच्या निकालावरून ही गोष्ट स्पष्ट होते. तसं पाहिलं तर भाजपने राज्यात दीर्घकाळ शिवसेनेसोबत युती करूनच निवडणूक लढली आहे. पण 2014 मध्ये पहिल्यांदा दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीनंतर भाजपला आपल्या राजकीय ताकदीची जाणीव झाली.

राज्यातील 240 मतदारसंघात भाजपला चांगला जनाधार आहे. शिवसेनेबरोबर युती असल्याने संपूर्ण राज्यात राजकीय आधार निर्माण करणे भाजपला शक्य झाले नव्हते. पण 2014 मध्ये स्वतंत्र लढल्यानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. याचाच परिणाम म्हणून 2019 मध्ये शिवसेनेबरोबर युती केल्यानंतरही भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त म्हणजेच 164 जागांवर उमेदवार दिले होते. शिवसेनेनं मात्र 124 जागा लढवल्या होत्या. इतकी वर्षे महाराष्ट्रात लहान भाऊ राहिलेला भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आला होता.

आगामी निवडणुकीत भाजपला एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी यांना (NCP) सोबत घेत जागावाटप करायचं आहे. याबरोबरच काही लहान पक्षांनाही ॲडजेस्ट करावे लागणार आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्त जागांची मागणी केली जात आहे. जर त्यांच्या वाट्याला जास्त जागा गेल्या तर भाजपला मागील 164 पेक्षाही कमी जागांवर लढावे लागण्याची शक्यता आहे. हा संभाव्य फॉर्म्युला भाजप नेत्यांना पसंत पडण्याची आजिबात शक्यता नाही.

‘जर निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर भाजपाला…’ राहुल गांधींचा खळबळजनक खुलासा

भाजपने जर 164 पेक्षा कमी जागा घेतल्या तर त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. जागावाटपात भाजपच्या ज्या नेत्यांना तिकीट मिळणार नाही किंवा त्यांचे मतदारसंघ शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेले तर त्यांच्या पुढे दोनच पर्याय राहतील. एक तर महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचा स्वीकार करा किंवा बंडखोरी करून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढा. आता या संभाव्य संकटाची चाहूल आताच लागली आहे. भाजप नेते नाराजी बोलून दाखवू लागले आहेत.

BJP भाजपला धक्क्यावर धक्के

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी (Sharad Pawar) भाजपला एका मागोमाग धक्के दिले आहेत. कोल्हापुरातील दिग्गज नेते समरजित सिंह घाटगे यांनी मागील आठवड्यात तुतारी हाती घेतली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शरद पवार गटात जाणे पसंत केले. आता त्यांना कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी तिकीट देणार आहे. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, सोलापूरचे उत्तमराव जानकर, प्रशांत परिचारक यांचाही मोहभंग झाला आहे. महायुतीत अजित पवारांच्या एन्ट्रीने अनेक नेत्यांचं गणित बिघडले आहे. ज्या मतदारसंघात अजित पवारांचे आमदार आहेत तिथे भाजप नेत्यांच्या निवडणूक लढण्यावर मोठं संकट आलं आहे.

BJP जागावाटप भाजपसमोर सर्वात मोठं आव्हान

राज्यात जवळपास दोन डझन मतदारसंघ असे आहेत जिथे राष्ट्रवादी विरोधात भाजप नेते तिकिटाच्या रेसमध्ये आहेत. 2019 मधील निवडणुकीत या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली होती. आता अजित पवार महायुतीत आल्याने त्यांचे ज्या मतदारसंघात आमदार आहेत तिथे तिकीट मिळेल याची खात्री भाजप इच्छुकांना राहिलेली नाही. त्यामुळे धास्तावलेल्या या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. काही जणांनी तर भाजपला सोडचिठ्ठी सुद्धा दिली आहे. अशात भाजपला सुद्धा जागावाटप आव्हान देणार ठरू लागलं आहे. त्यामुळे आता भाजप यातून कसा मार्ग काढणार? जागावाटप यशस्वी होणार का? युती टिकणार का? जर युती टिकली तर भाजपला किती जागा मिळणार? याची उत्तरे लवकरच मिळतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img