अमेरिकी सरकारने भारतावर जो अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आकारला होता (India US Tariff War) त्याची अंमलबजावणी उद्यापासून (27 ऑगस्ट) सुरू होणार आहे. या संदर्भात ट्रम्प सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. होमलँड सिक्युरिटी विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की नवीन टॅरिफ रशियाच्या सरकारकडून अमेरिकेला दिल्या जात असलेल्या धमक्यांच्या उत्तरात होते. अमेरिकेच्या या रणनितीत आता भारताला विनाकारण टार्गेट केले जात आहे.
खरंतर भारत रशियाकडून जे तेल खरेदी करत आहे त्यामुळे ट्रम्प सरकार चिडले आहे. आधी भारतावर दबाव आणून पाहिला तरीही भारताने तेल खरेदी बंद केली नाही. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अतिरिक्त 25 टक्के टॅरिफची घोषणा केली होती. म्हणजेच भारतीय वस्तुंच्या आयातीवर आता एकूण 50 टक्के टॅरिफ अमेरिका सरकार वसूल करणार आहे. ट्रम्प सरकारच्या या निर्णयानंतर दोन्ही देशांतील संबंध अधिक ताणले गेले आहेत.
India US Tariff War भारत दबावाचा सामना करील : पीएम मोदी
नवीन टॅरिफची अंमलबजावणी सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दांत मेसेज दिला होता. भारत आर्थिक दबावाचा सामना नक्कीच करेल कारण धोरणात लवचिकता कायम राखली जाणार आहे. अहमदाबाद येखील एका रॅलीत मोदींनी हे वक्तव्य केले. कितीही दबाव आला तरी हा दबाव सहन करण्याची ताकद आपण वाढवत राहू. केंद्र सरकार लघु उद्योजक, शेतकरी आणि पशुपालकांना कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ देणार नाही. आज जगात आर्थिक स्वार्थाचं राजकारण सुरू आहे. सगळेच जण याच पद्धतीने वागत आहेत. या गोष्टींची आम्हाला जाणीव आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
India US Tariff War ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी भारतात राजदूत
भारताबरोबर सुरू असलेल्या टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी असलेल्या सर्जियो गोर यांना भारतात अमेरिकेचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. याचबरोबर गोर यांना साउथ अँड मिडल ईस्ट आशिया देशांतील प्रकरणांच्या बाबतीत विशेष दूत म्हणूनही जबाबदारी दिली आहे. ट्रम्प सरकारकडून भारतावर आकारण्यात आलेल्या 50 टक्के टॅरिफ करानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.