आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील पहिल्या कॉमन सेंट्रल सेक्रिटेरिएट इमारतीचे, ‘कर्तव्य भवन-03’चे उद्घाटन केले. या आधुनिक सचिवालयामुळे विविध मंत्रालये व विभाग एका छताखाली येऊन प्रशासन अधिक सुव्यवस्थित व वेगवान होईल.
कर्तव्य भवन-03 मध्ये 1.5 लाख चौरस मीटर बांधकाम, भूमिगत 40 हजार चौरस मीटर क्षेत्र, 600 कार पार्किंग, बालगृह, योगा व वैद्यकीय कक्ष, कॅफे, मोठ्या व लहान अशा एकूण 50 कॉन्फरन्स रूम, 67 बैठक कक्ष आणि 27 लिफ्ट्सची सुविधा आहे.
सेंट्रल व्हिस्टा (Central Vista) पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एकूण 10 सीसीएस इमारती बांधल्या जाणार असून प्रकल्प जून 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. शास्त्री भवन, कृषी भवन, निर्माण भवन व उद्योग भवन यांसारख्या जुन्या इमारती पाडून नवी बांधकामे उभारली जातील. दरम्यान, जुन्या कार्यालयांना तात्पुरते कस्तुरबा गांधी मार्ग, मिंटो रोड व नेताजी पॅलेस येथे हलवण्यात येईल.
हा प्रकल्प केवळ इमारती बांधण्यापुरता मर्यादित नसून, तो भारताच्या प्रशासकीय क्षमतेचा आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा नवा चेहरा ठरणार आहे. यामध्ये नवीन पीएमओ, कॅबिनेट सचिवालय, इंडिया हाऊस आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचाही समावेश असेल. तसेच कर्तव्य पथ परिसरातील हिरवाई, पायवाटा आणि नागरी सुविधा यांचाही मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे.