गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी बोलण्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मराठी भाषा बोलण्यास आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या नावे हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करणार, असा इशारा दिला आहे. ज्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांनी फडणवीसांना आव्हान देत मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय करायचे आहे ते करा, असे आव्हानच राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस… हे राज्य मराठी माणसाचे आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 3 ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा खासदार राऊतांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार. काय करायचं ते करा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसाचे आहे. आमच्या बापजाद्यांनी, 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही ते बलिदान दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात. पण ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्री पद जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागाल, हे आम्हाला माहीत आहे, असे यावेळी राऊतांनी म्हटले.
तसेच, मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार. तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहात का? असा खोचक सवालही यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला. आमच्यावर तुम्ही मराठीचा आग्रह केला म्हणून गोळ्या घालणार आहात का? हो आम्ही मराठीचा आग्रह करत आहोत आणि तो आग्रह आम्ही धरणार आहोत. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये. तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा मग महाराष्ट्रावर हिंदी सक्ती लादा. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात जो मुद्दा सांगितला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलण्यात आले. त्या अल्पेश ठाकूरला नंतर यांनी आमदार केले. त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगू नका, असेही राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
तर, नरेंद्र मोदी, अमित शहा हे काय करत आहेत, ते पाहा. अमित शहा म्हणतात की ते आधी गुजराती आहेत. मग आम्ही आधी मराठी नाही का? हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे काय करायचे ते करा, असे आव्हानच राऊतांकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या या आव्हानाला मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपाचे नेतेमंडळी काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.