19 C
New York

Eknath Shinde : मालेगाव स्फोट निकालावर शिंदे स्पष्टच बोलले

Published:

आज जवळपास 17 वर्षांनी 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आहे. पुराव्यांअभावी या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निकाल NIA जिल्हा सत्र न्यायालयाकडून देण्यात आला आहे. या निकालानंतर न्यायालयात हजर असलेल्या सर्व आरोपींना अश्रू अनावर झाले. पण उशिरा का असेना या प्रकरणातील दोषींना न्याय मिळाला आणि भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले की, न्यायालयाच्या निकालाचे सर्वांनीच स्वागत केले आहे. पण न्याय मिळण्यास उशीर झाला आहे. परंतु, देर आए दुरुस्त आए… उशिरा का असेना पण त्यांना न्याय मिळाला आहे. खरं म्हणजे, त्यावेळेस देशात युपीए सरकार होते आणि त्या सरकारच्या काळात अनेक बॉम्बब्लास्ट झाले होते. त्यावेळी त्या सरकारचे म्हणणे होते की, दहशतवादाला, आतंकवादाला कोणता रंग नसतो. परंतु, मालेगावचा ब्लास्ट झाला आणि त्या लोकांनी म्हटले की, हा भगवा दहशतवाद आहे आणि त्यामध्ये त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

परंतु, आजच्या निकालामुळे त्यावेळी जे काही राजकारण करण्यात आले किंवा तेव्हा या प्रकरणाला जे काही ट्वीस्ट करण्यात आले, त्याला चपराक देण्याचे काम न्यायालयाने केले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय झालेला आहे आणि निर्दोष लोकांना न्याय मिळाला आहे. खरं म्हणजे, भगवा दहशतवाद म्हणून खऱ्या अर्थाने हिंदुत्वाला त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. पण हिंदु सहिष्णु असतो, देशविरोधी आणि देशविघातक कारवाया कधीच करत नसतो. हे आजच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. म्हणून मी कोर्टाने दिलेल्या या निकालाचे स्वागत करतो. झालेली घटना दुर्दैवी आहे. कोणत्याही दहशतवादाचे समर्थन करत नाही आणि समर्थन करणार नाही. त्यामुळे जे सत्य आहे ते समोर आले पाहिजे. न्याय व्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img