राजकारणातून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी शासन यंत्रणा कशी वापरली जाते, याचे एक गंभीर उदाहरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समोर आणले आहे. त्यांनी आरोप केला की, नाशिक येथील एक शेतकरी कृष्णा डोंगरे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखवून त्यांची मानहानी करण्यात आली आणि सरकारविरोधातील आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला.
संजय राऊत म्हणाले, “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्यामुळे आंदोलन केलं होतं. कृष्णा डोंगरे हे त्या आंदोलनात आघाडीवर होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी राग ठेवून त्यांच्यावर कारवाईचा कट रचला.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजप समर्थित एका खासगी शिक्षण संस्थेच्या सहाय्याने, एका शिक्षिकेचा वापर करत डोंगरे यांच्यावर बलात्काराचा खोटा आरोप करण्यात आला. पोलीस व काही मंत्री यांचं संगनमत होतं, असंही ते म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवल्याने डोंगरे यांना गाव सोडावं लागलं.
संजय राऊत यांनी खुलासा केला की, घटना ज्या दिवशी घडली असे सांगितलं गेलं, त्या दिवशी कृष्णा डोंगरे हे सप्तशृंगी गडावर आपल्या कुटुंबासोबत दर्शनासाठी गेले होते. वणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची उपस्थिती स्पष्टपणे दिसून आली असून, न्यायालयानेही हे लक्षात घेत हस्तक्षेप केला.
यावेळी राऊत यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितलं की, नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी काही शिवसेना कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी अशाच प्रकारच्या खोट्या गुन्ह्यांची योजना आखली होती. “सुनील बागुल, मामा राजवाडे यांसारखे कार्यकर्ते पोलिसी कारवाईच्या भीतीने परागंदा झाले. आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई थांबवली गेली,” असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणाने केवळ एका शेतकऱ्याच्या प्रतिष्ठेवर घाला घातला नाही, तर सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. विरोधकांवर राजकीय सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करणं ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे, असा गंभीर इशाराही संजय राऊत यांनी दिला.