मोठ्या आशेने ५ जुलैला वरळी डोम येथे ठाकरे नावावर प्रेम करणारा मराठी माणूस हजारोंच्या संख्येने आला. (Maharashtra Politics) एकही माणूस यातील पैसे देऊन, जेवणाच्या पाकिटाच्या लोभाने, थोडक्यात सांगायचे तर स्वत:च्या फायद्यासाठी आलेला नव्हता. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मनात ठाकरे कुटुंब पुन्हा एका फ्रेममध्ये पाहायला मिळणार तो क्षण डोळ्यात साठवण्याची, मनात भरून घेण्याची निर्लेप इच्छा होती. आठ-नऊ हजार आसनक्षमता वरळी डोम येथील पूर्ण झाल्यानंतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र गेटच्या बाहेर असलेल्या लोखंडी गेटही मराठी माणसांच्या ठाकरे नरेट्यापुढे, प्रेमापुढे,ते तग धरू शकले नाही. गेट खाली पडल्यानंतर जो मराठी माणसांचा लोंढा आत शिरला त्याला फक्त दोन भावांना एकत्र आलेले पाहायचे होते.
आता शिवसेनेचे सोनेरी दिवस मृगजळ राहिलेले नाही, त्या गर्दीत ही भावना घेऊन जुने जाणते शिवसैनिकही वाट काढत पुढे चालत होते. अंगावर शहारे आणणारा तो विजयोत्सव होता. मात्र अवघ्या तीनच दिवसांत 8 जुलै रोजी राज ठाकरेंच्या एका सोशल मीडिया पोस्टने मराठी जनांच्या मनात पुलकीत झालेल्या पालवीची पाने खुडली. एक स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी काढला की ‘पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही.’ राज ठाकरे यानंतर पुन्हा एकदा मौनात गेले आहेत.
एकाच वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एका मंचावर येणे, एकमेकांना आलिंगन देणे, दोघांच्या पत्नी, मुलांनी हातात हात घेत फोटोसाठी पोज देणे हा फक्त फोटोत्सव होता का, असा प्रश्न राज ठाकरेंच्या आदेशाने निर्माण झाला आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे) खासदार आणि राज-उद्धव या दोघांनाही जवळून ओळखणारे संजय राऊत मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र येऊन लढायला पाहिजेत, यासाठी जनतेचा दबाव असल्याचं सांगत आहेत. त्यासाठी ते पुन्हा एकदा त्याच ५ जुलैच्या मराठी विजयोत्सव मेळाव्याचा दाखला देत आहेत.
युती तोडायची असेल किंवा युती करायची असले संजय राऊत हे याची साखरपेरणी व्यवस्थित करतात. राज ठाकरेंच्या निवासस्थानाला काही दिवसांपूर्वी कॅफे म्हणणारे राऊत आता सन्माननीय राज साहेब असा उल्लेख करू लागले आहेत. राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊन मुंबई महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था लढल्या पाहिजेत, यासाठी जनतेचा दबाव असल्याचे ते आता सांगत आहेत. त्यासाठी त्यांची तयारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतची महाविकास आघाडी, इंडिया आघाडी सोडण्याचीही दिसत आहे. एकदा शरद पवारांनी इंडिया आघाडी आता अस्तित्वात नाही असं म्हटलं होतं. आता संजय राऊतही तोच सूर आळवत आहेत.
इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली. आम्ही लोकसभेची निवडणूकही जिंकली. त्यानंतर मात्र इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नाही, असे आता राऊत सांगायला लागले आहेत. याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली होती, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. एकूण काय तर इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही कधीही एकत्र येऊ हा सोयीचा मार्ग कायम ठेवून, आता इंडिया आघाडीची आवश्यकता संपली असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. महाविकास आघाडीबद्दल मात्र ते असे करू शकलेले नाहीत.
विधिमंडळाचे अधिवेशन चालू आहे. तिन्ही पक्ष अजूनही विधिमंडळात एकत्र आहेत. त्यामुळेच राऊतांनी येथे सावध पवित्रा घेत, महाविकास आघाडीच्या नियमित बैठका होतात. महाविकास आघाडीचे सर्व निर्णय एकत्रित घेतले जातात. मात्र स्थानिक प्रश्नांवर आणि स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून युती-आघाडीचा निर्णय महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांचे गणित वेगळे आहे. येथे घेतला जातो. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांची निवडणूक मनसे आणि शिवसेनेने (ठाकरे) एकत्र येऊन एकत्र लढावी, असा राऊत म्हणत जनतेचा दबाव असल्याचे आहेत. पण तसा प्रतिसाद मनसेकडून मिळताना दिसत नाही.
इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीबद्दलच्या वक्तव्याचा संजय राऊत यांचे विचार केला तर राज ठाकरे यांनाच हा सूचक इशारा आहे. काँग्रेससोबत तुम्ही येण्यास तयार नसाल तर आम्हीदेखील काँग्रेससोबत जाऊ इच्छित नाही, असेच राऊत सूचवत आहेत. ५ जुलैच्या मेळाव्यापासून काँग्रेसदेखील दोन हात दूर राहिली. ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसविरहित डावे, शेतकरी कामगार पक्ष आणि काही रिपब्लिकन नेत्यांना सोबत घेण्याचा विचार आहे. सध्या कुठेच नसलेले महादेव जानकर देखील या मेळाव्याला हजर होते. सुप्रिया सुळेंचा या मेळाव्यात उत्साह लपून राहिला नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेत फारसे स्थान नसलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही महत्त्व मिळण्याची यामागे गोळाबेरीज आहे.
उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे स्वत: बोलायला तयार नाहीत आणि त्यांच्या पाठीराख्यांनाही त्यांनी दम भरला आहे की, कोणी ही बोलू नका. राज यांनी विजयी मेळाव्यातही त्यांचा तोल मराठी भाषेवरून इतरत्र ढळू दिला नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या मोकळेपणाने राज यांना सोबत घेण्यासाठी हात पुढे केला राज यांच्या भाषणात आणि देहबोलीतही तेवढा बिनधास्तपणा नव्हता. सध्या भाजपसोबत राज ठाकरे यांचे सूत्र जुळलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्यांचे अजून फार वाईट संबंध नाहीत. मराठीचा मुद्दा आणि विजयी मेळाव्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींनी बॅक फूटवर गेलेले राज ठाकरे फ्रंट फूटवर आले. देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधू एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी देऊन एकप्रकारे फडणवीसांबद्दल सकारात्मक भाषा केली. तर फडणवीसांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केलेला हा तुच्छतेचा होता.
उद्धव ठाकरेंना शिवसेना फोडणार्या, निशाणी चोरणार्यांना नामोहरम होताना पाहायचे आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जागोजागी अमित शहांना धक्का देण्याची इच्छा आहे. मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्याच शिवसेनेचा झेंडा उद्धव यांना हवा आहे. राज आमच्यासोबत त्यासाठी ते संधी मिळेल तिथे असल्याचे सांगत आहेत. मिरारोड येथील मनसेच्या मोर्चात ठाकरेंचे राजन विचारे सहभागी झाले. मनसेचे बाळा नांदगावकर आणि स्वत: उद्धव ठाकरेही आझाद मैदानावरील गिरणी कामगारांच्या आंदोलनात हजर राहिले.दोन्ही भाऊ वरळीच्या विजयी मेळाव्यात एकत्र आलेले पाहून बाळा नांदगावकर यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यांचे डोळेच काय ते बोलत होते. आता त्यांच्या नेत्यांनी त्यांचे शब्दच गोठवून टाकले.
राज ठाकरे यांनी लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने विधानसभेत त्यांना साथ दिली नाही. पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंचा मुलगाही पराभूत झाला. तरीही राज ठाकरे भाजप आणि शिंदेबद्दल ठाकरी शैलीत बोलायला तयार नाही. अनेक छोट्या-मोठ्या मुलाखतींमधून भाजपबद्दल असलेला त्यांचा सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या झळकत असतो. भाजप नेत्यांशी माझी नैसर्गिक मैत्री आहे. आमच्या (तत्कालीन शिवसेना) पक्षाची युती राजकारणात आलो तेव्हापासून भाजपसोबतच होती. त्यामुळे त्यांच्यासोबत अधिक कम्फर्टेबल असतो. दुसरा मुद्दा विचारधारेचा, तिथेही दोघांची नाळ जुळते.
आज शिंदेंची शिवसेना भाजपसोबत असली तरी भाजपला राज ठाकरेंना मोठं करून त्यांना सोबत घेणं कधीही फायद्याचं आहे. यातून भाजप एका दगडात दोन पक्षी मारणार. आज तरी हा सगळा शक्यतांचाच खेळ आहे. कारण नेमकी कुठली भूमिका आपण घ्यावी, अजून हे राज ठाकरे यांच्या मनात नेमके स्पष्ट झालेले नाही, असेच त्यांचा सध्याचा पवित्रा पाहिल्यावर दिसत आहे. दुसर्या बाजूला उद्धव ठाकरे प्रवक्ते संजय राऊत यांच्या माध्यमातून सतत राज यांनी आपल्यासोबत येण्यासाठी पोषक वातावरण तयार करू पाहत आहेत. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतगरज नाही, इथपर्यंत राऊत यांचा आत्मविश्वास वाढला आहे, पण राज ठाकरे वेट आणि वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत.