तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती.. रस्त्यावर- राज ठाकरे
“खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. गरज नव्हती. कुठून हिंदीचं आलं ते कळलं नाही. हिंदी. कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी. लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. कुणाला विचारायचं नाही. शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही लादणार. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे. ती रस्त्यावर,” असं राज ठाकरे म्हणाले.
माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी- राज ठाकरे“
आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय,. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना. आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी,” असं राज ठाकरे म्हणाले.
जे बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं- राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं.. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
“खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. पण नुसतं मोर्चाच्या चर्चेनंत माघार घ्यावी लागली. आजचा हा मेळावा शीवतीर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. मी बाहेर उभं असलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो,” असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या राज्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात
ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उद्धव ठाकरे वरळी डोममध्ये दाखल
उद्धव ठाकरे हे वरळी डोममध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेसुद्धा आहेत. तर दुसरीकडे अमित ठाकरे हेसुद्धा वरळी डोममध्ये याआधी दाखल झाले होते.
राज ठाकरेसुद्धा मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले
राज ठाकरे वरळी डोममध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी अमित ठाकरे आणि मितालीसुद्धा तिथे पोहोचले होते. उद्धव ठाकरेसुद्धा मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत.
मराठी बोलणारच नाही हे काही बरोबर नाही, केडियावर भुजबळांची प्रतिक्रिया
“मराठी माणूस ज्या राज्यात गेले, त्याठिकाणी ते त्या-त्या राज्याची भाषा बोलतात. मराठी बोलणारच नाही हे काही बरोबर नाही. जे मंडळी मराठी बोलणार नाहीत असे सांगतात, ते परदेशी गेल्यावर इंग्रजी बोलतात,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी सुशील केडिया यांच्या प्रकरणावर दिली.