राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा (Hindi In Trilingual Formula) म्हणून हिंदी किंवा भारतीय भाषा शिकविण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर एकाच दिवसात तिसऱ्या भाषेचा समावेश असलेले वेळापत्रक आणि विषयनिहाय योजना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केली. मात्र, तिसऱ्या भाषेसाठीची पाठ्यपुस्तके आणि शिक्षक कसे उपलब्ध करणार, ऑनलाइन शिकण्याबाबतची पद्धत कशी असणार, याबाबत स्पष्टता नसल्याने वेळापत्रकाची घाई कशासाठी, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.
पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांध्ये सर्वसाधारणपणे अन्य भारतीय भाषांचा पर्याय हिंदी किंवा काही अटींसह उपलब्ध करून देणारे शालेय शिक्षण विभागाने शुद्धिपत्रक १७ जून रोजी प्रसिद्ध केले. यामुळे राज्यात हिंदी पहिलीपासून अप्रत्यक्षपणे सक्तीनेच शिकवली जाणार असल्याचं दिसून येत आहे. या निर्णयावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, शिक्षण विभागाने आता निर्णयाच्या अंमलबजावणीचे पाऊल उचललं आहे.
विषययोजना, इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून वेळापत्रकाबाबतचे निर्देश अंमलात येतील. इयत्ता दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर निर्देश बंधनकारक राहतील. तासिकेच्या क्रमवारीमध्ये, शाळा सुरू करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. मात्र,अध्ययन-अध्यापनाचा कोणत्याही विषयासाठी साप्ताहिक आणि वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी विषयनिहाय शाळास्तरावर कमी करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इयत्ता पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी लागू झाल्याने गुरुवारी सुधारित विषययोजना, तासिका विभागणी आणि वेळापत्रकाबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार, मराठी (स्तर १), इंग्रजी (स्तर २) , हिंदी किंवा इतर भारतीय भाषा, गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षणमराठी माध्यमाच्या शाळांमध्ये, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी (स्तर १), मराठी (स्तर २), हिंदी किंवा इतर भारतीय भाषा, गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी, ऊर्दू, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, सिंधी, बंगाली यापैकी माध्यम भाषा (स्तर १), इंग्रजी (स्तर २), मराठी (अन्य माध्यमांसाठी), गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे विषय असणार आहेत. स्काउट-गाइड हा विषय ऐच्छिक असणार आहे.