20.9 C
New York

BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपचा मेगा मास्टरप्लॅन!

Published:

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, भाजपने (BJP) मोठा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये निर्णायक विजयासाठी भाजपने पक्षप्रवेशाचा धडाका लावण्याचे नियोजन सुरू केले आहे. यामार्फत महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांना गळाला लावून, नाशिकसह मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला मोठे भगदाड पाडण्याचा भाजपचा डाव आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, पुढील काही महिन्यांत दर आठवड्याला छोटे-मोठे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. हे प्रवेश ‘सामान्य’ नसतील, तर महाविकास आघाडीतील बडे चेहरे आणि नाराज गटांवर थेट लक्ष केंद्रित करून भाजप त्यांना आपल्या गोटात खेचणार आहे.

BJP महाविकास आघाडीतील असंतोष भाजपसाठी संधी

महाविकास आघाडीत सध्या अंतर्गत मतभेद आणि नाराजीचं वातावरण आहे. याचा फायदा घेण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून, महाविकास आघाडीतील काही नामांकित नेते भाजपच्या संपर्कात असल्याचेही भाजपच्या गोटातून संकेत मिळाले आहेत. काही नेत्यांच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष पक्षप्रवेशाची तारीखही ठरवली गेली आहे.

BJP भाजपची ‘स्पॉट टार्गेटिंग’ रणनीती

नाशिक, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार प्रमुख विभाग भाजपच्या नव्या ‘स्पॉट टार्गेटिंग’ रणनीतीचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. या भागांत महाविकास आघाडीला मजबूत संघटनात्मक उपस्थिती आहे, त्यामुळेच भाजपने तेथील नाराज गटांना आपल्याकडे खेचण्याचे धोरण आखले आहे. अधिक आक्रमक भूमिका भाजपचे स्थानिक नेते या भागांत भविष्यात घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

BJP भाजपचा ‘मिशन २०२५’साठी संघटन विस्तारावर भर

भाजपने ‘मिशन २०२५’ अंतर्गत स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्यांचा समावेश हा केंद्रबिंदू ठरवला आहे. राजकीय ओळख, प्रभावक्षेत्र आणि समाजातील पकड याच्या आधारे निवड करण्यात येणार असून, पक्षप्रवेश कार्यक्रमांद्वारे एकाच वेळी कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांना सामावून घेण्यात येणार आहे.

BJP राजकीय तापमान चढणार!

या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकीय तापमान लवकरच वाढणार हे निश्चित मानले जात आहे. एकीकडे भाजप आपली ताकद वाढवतोय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये गटबाजी आणि नाराजीचा फटका दिसून येऊ लागला आहे. पक्षप्रवेशांच्या माध्यमातून भाजपने स्थानिक निवडणुकांमध्ये “खेळ पलटण्याची” तयारी सुरू केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img