योगगुरू बाबा रामदेव यांच्या (Baba Ramdev) अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी (Patanjali) सरकारी यंत्रणांच्या रडारवर आली आहे. पतंजली आयु्र्वेद लिमिटेडचे काही संशयास्पद व्यवहारांवर सरकारने स्पष्टीकरण मागितले आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की कॉर्पोरेट अफेयर्स मिनिस्ट्रीने कंपनीला नोटीस धाडली आहे. आर्थिक गुप्तचर विभागाला कंपनीचे काही देवाणघेवाणीचे व्यवहार संशयास्पद वाटले आहेत. या व्यवहारातील रकमेचा अद्याप खुलासा झालेला नाही. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी कंपनीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मंत्रालयाकडून कंपनीचे कामकाज आणि पैशांचा वापर कशा पद्धतीने होतो याचीही तपासणी करणार आहे. मंत्रालयाने याबाबतीत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पतंजली आयुर्वेदच्या प्रवक्त्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही कंपनी अडचणीत सापडलेली आहे. मागील वर्षात कंपनीने कर भरला नाही आणि चुकीच्या पद्धतीने रिफंड मागितल्याचा आरोप कंपनीवर झाला होता. न्यायालयाने कंपनीला काही उत्पादनांच्या जाहिराती करण्यापासून रोखले होते.
पतंजली आयुर्वेद एक खासगी कंपनी आहे. परंतु, कंपनीचे एक युनिट पतंजली फुड्स लिमिटेड शेअर बाजारात लिस्टेड आहे. या महिन्यात या युनिटच्या शेअर्समध्ये 10 टक्के घसरण झाली आहे. शुक्रवारी बीएसईवर 3 टक्के घसरणीसह 1691.10 रुपयांवर शेअर होता. मागील वर्षात कंपनीच्या एका युनिटला सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. न्यायालयानेही कंपनीला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की काही उत्पादने आजारांच्या औषधांच्या स्वरुपात विक्री करू नका.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज कायदा 1954 चे उल्लंघन केल्याचा दाखला देत कंपनीला विविध आजारांवर उपचार म्हणून त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यास मनाई केली होती. याच कायद्यांतर्गत फेब्रुवारी 2025 मध्ये केरळ ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटने राज्यातील विविध न्यायालयांत रामदेव आणि पतंजली विरोधात 26 खटले चालू असल्याचे सांगितले होते.
अनेक वर्तमानपत्रांत वादग्रस्त जाहिराती छापल्याबद्दल कायदेशीर कारवाई देखील केली होती. आता परत कंपनी अडचणीत आली आहे. सरकारच्या या नोटीशीला रामदेव बाबा काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.