ओतूर (Otur) ,प्रतिनिधी:दि.२९ मे ( रमेश तांबे )
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ओतूर,आळेफाटा, (Crime News) खेड पोलीस स्टेशन हद्दित चोरी करून, दरोडा टाकून घरफोडी करणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या असून, सदर आरोपीकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम एक एक्टिवा असा एकूण १० लाख ५५ हजार ३९३ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे यांनी दिली.
अक्षय यशवंत शिंगोटे वय २९ वर्षे, रा.उंब्रज नं.१, ता.जुन्नर, जि.पुणे असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्री थाटे म्हणाले की,आरोपी अक्षय शिंगोटे याने ओतूर,आळेफाटा,खेड पोलीस स्टेशन हद्दित उंब्रज नं. १ व उंब्रज नं. २ या गावचे परिसरात तसेच लगतच असलेले आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दितील मौजे काळवाडी, पिंपळवंडी या गावच्या परिसरात घरफोडी,दरोडा चोरीच्या घटना घडल्याने आळेफाटा,ओतूर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल झाले असल्याने ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना संशयीत इसम अक्षय शिंगोटे यास ताब्यात घेवून त्याचे मोबाईल संदर्भात तांत्रिक माहीती, तसेच बँक व गोल्ड लोन खाते डिटेल्स प्राप्त करून त्याआधारे त्याचेकडे तपास करता त्याने वरील गावचे परिसरात घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले.आरोपी अक्षय यशवंत शिंगोटे याचेकडुन ९ लाख ३८ हजार ३९३ रूपये किंमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने, ९२ हजार रूपयांची रोख रक्कम व चोरीचे गुन्हे करताना वापरलेली २५ हजार रूपये किंमतीची होंडा एक्टिवा नं. एम.एच.१४ के.सी.४३४८ असा एकूण १० लाख ५५ हजार ३९३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी अक्षय शिंगोटे यास ओतूर पोलीस स्टेशनचे गुन्ह्यात मा. जुन्नर न्यायालय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर करण्यात आले असता,सदर आरोपीस मा.न्यायालयाने वेगवेगळ्या गुन्ह्यात एकूण १४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. त्यानंतर मा. न्यायालयाने आरोपीची मॅजिस्टेट कस्टडी मंजुर केल्याने आरोपीची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचे राजीनामा कोणाकडे सादर करतात?
सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल,अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ठाणे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव,संदीप आमने,पो.हवा.संदिप लांडे,भरत सुर्यवंशी,महेश पटारे, नदीम तडवी, नामदेव बांबळे, दिनेश साबळे, शंकर कोबल, विलास कोंढावळे, पो. कॉ. शामसुंदर जायभाये, विशाल गोडसे, ज्योतीराम पवार, अतुल भेके, विश्वास केदार,अमोल शिंदे, मनोज राठोड, पोलीस पाटील राहुल हांडे, किरण भोर व पोलीस मित्र नामा पानसरे, शंकर अहिनवे यांनी केली आहे.
दाखल गुन्हयाचा पुढिल तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस.आमने,पोलीस हवा.संदिप लांडे, पोलीस हवा.भरत सुर्यवंशी हे करत आहेत.