राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहि महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांतवर या महिलेने फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत या महिलेने सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस धाडली आहे. शारीरिक, मानसिक छळ, फसवणूक, धमकी या सगळ्याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे.
संजय शिरसाट यांच्या मुलावर होत असलेले आरोप नेमके काय आहेत? हा प्रकार नेमका आहे तरी काय जरा समजून घेऊ..
या प्रकरणात संबंधित विवाहित महिलेने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यानुसार सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून 2018 मध्ये ओळख झाली होती. ओळखीचे पुढे मैत्रीत रुपांतर झाले. पुढे चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटही झाली होती. यानंतर सिद्धांतकडून महिलेकडे लग्नासाठी तगादा लावला जात होता. परंतु, महिला आधीच विवाहीत होती.
सिद्धांत यांनी ब्लॅकमेल करत लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन असा आग्रह धरला होता. नंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेऊन लग्न केलं असा दावा महिलेने केला आहे. सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत 14 जानेवारी 2022 रोजी विवाह केल्याचा दावाही या महिलेने केला आहे. लग्नानंतर मात्र सिद्धांतच्या वर्तणुकीत बदल झाला. त्यांनी मला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितलं. छत्रपती संभाजीनगरला येण्यास नकार दिला होता. तू जर पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपू्र्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी धमकीही दिली जात होती असा आरोप या महिलेने केला आहे.