‘ऑपरेशन सिंदूर’ म्हटलं की डोळ्यासमोर सर्रकन येते ती पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी कारवाई आणि त्याचा लोगो. डार्क काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड अन् त्यावर कॅपिटल बोल्ड अक्षरात लिहिलेलं Operatin Sindoor आता लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच परिचित झालं आहे. पण, लष्करी कारवाईचा हा लोगो नेमका कुणी आणि कितीवेळात बनवला असा प्रश्न देशातील करोड नागरिकांच्या मनात असून, आता या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.
Operatin Sindoor लोगोमध्ये O च्या जागी वाटीतील सिंदूर
सिंदूरच्या स्पेलिंगमध्ये समाविष्ट असलेल्या ‘ओ’ च्या जागी, सिंदूर प्रतीकात्मकपणे एका वाडग्यात ठेवले आहे, पण हे सिंदूर वाडग्यातून विखुरलेले दाखवण्यात आले आहे. हे पसरलेले सिंदूर रक्ताचे प्रतीक आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निर्घृणपणे मारल्या गेलेल्यांचे रक्त असे यातून दर्शवण्यात आले आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर लिहिलेल्या फोटोने सोशल मीडिया गजबजून गेले होते.
Operatin Sindoor कुणी बनवला लोगो?
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता त्याबाबत नव-नवीन माहिती समोर येत असून, या कारवाईच्या लोगोबाबत लष्करानेच खुलासा केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा हा ‘लोगो’ भारतीय लष्कराच्या मुख्यालयात तैनात असलेले कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग यांनी तयार केल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीत हा लोगो बनवण्यासाठी फक्त ४५ मिनिटांचा कालावधी लागल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अवघ्या ४५ मिनिटात बनलेल्या या लोगोचा प्रभाव इतका जबरदस्त होता की यातील दोन शब्दांची सर्जनशील रचना संपूर्ण ऑपरेशनची कहाणी सांगून जाते.