महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू राज्याच्या राजकारणात लवकरच एकत्र येतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुद्धा सुरू झाली होती. पण काही कारणास्तव ही चर्चा थांबली गेली. पण आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा याबाबत विविध चर्चा तर रंगू लागल्याच आहेत, पण पडद्याच्यामागे नेमके काय घडत आहे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. पण याव्यतिरिक्त महत्त्वाचे म्हणजे, राऊतांनी राज ठाकरेंविषयी बोलताना खंत व्यक्त केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 16 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी काही गोष्टी विचारण्यात आल्या. ज्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, मी तुरूंगात होतो, तेव्हा राज ठाकरेंनी एकदा फोन करायला हवा होता. राज ठाकरे माझे मित्र होते. आमचे चांगले संबंध होते. राजकारण वेगळे असले तरी अशावेळी घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा फोन जरी गेला तरी एक आधार वाटतो, की आपल्यासोबत कोणी तरी आहे. ज्या पद्धतीने आमच्यावर संकटाचा डोंगर कोसळला होता, व्यक्तीश: नाही, कुटुंबावर. तेव्हा एक काडीचा आधार असतो. कोणीतरी फुंकर मारणे महत्त्वाची असते, तेव्हा राज ठाकरे यांनी एक फोन तरी करायला हवा होता, असे म्हणत राऊत यांनी मनातील खंत बोलून दाखवली आहे.
पवारांमुळे मोदी तुरूंगात जाता जाता वाचले; राऊतांच्या खळबळजन दाव्यानं राजकारण पेटणार
यावेळी राऊतांना मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील युतीबाबतची चर्चा थांबली आहे का? असा प्रश्न प्रसार माध्यमांनी विचारला. याबाबत स्पष्ट उत्तर देत राऊत म्हणाले की,तुम्हाला काहीच माहित नाही काय घडत आहे ते? तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरून बातम्या करत आहात. पण पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाणार आहे. या सगळ्याचे बाळंतपत होऊ द्या. पण सध्या सगळं व्यवस्थित सुरू आहे. आम्ही सकारात्मक आहोत, असे राऊतांकडून यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे. तर हे दोन्ही पक्ष काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र निवडणूक लढतील का? असा प्रश्न पुन्हा नव्याने निर्माण झाला आहे.