ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात कारागृहात असताना त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं प्रकाशन होण्याआधीच पुस्तकात त्यांनी देशाच्या राजकारणातील काही गुपितं लिहून ठेवली आहेत. अशी गुपितं जी कधीही कोणासमोर आलेली नाहीत. यामध्ये भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कशा पद्धतीने मदत केली, याबाबतचा सगळाच कट्टाचिठ्ठा संजय राऊतांनी बाहेर काढलायं. गुजरात दंगल प्रकरणातून बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाहांना कसं वाचवलं? याबाबतची संपूर्ण कहाणीच संजय राऊतांनी लिहून ठेवलीयं.
गुजरात दंगल प्रकरणात अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे मदत करु शकतात, असं त्यांना कोणीतरी सुचवलं. त्यानंतर अमित शाह आपला मुलगा जय शाह यांना घेऊन थेट मुंबईत दाखल झाले. दाखल होताच अमित शाह यांना कलानगरच्या मुख्य गेटवरच अडवून ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी अमित शाह बराच वेळ घामाघूम होऊन प्रतिक्षेत होते. दुसऱ्या दिवशी शाह मातोश्रीवर पोहोचल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळसााहेब ठाकरे यांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली होती. गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची आपण शिक्षा भोगत असल्याची दर्दभरी रोमांचक कहाणी अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली असल्याचा दावा संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग पुस्तकात केला आहे.
अमित शाह यांनी बाळासाहेबांना संपूर्ण माहिती सांगितल्यानंतर मी काय करु, असं बाळासाहेबांनी अमित शाहा यांना विचारलं होतं. त्यावर अमित शाह म्हणाले, “आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेगें” असं अमित शाह यांनी बाळासाहेबांना सांगितलं. त्यानंतर बाळासाहेबांनी चिरुटाचा झुरका मारला अन् धूर सोडला. त्यानंतर फोन केला, ज्यांच्याकडे अमित शाहांचं प्रकरण होतं, त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरुन बाळासाहेब थेट बोलले. तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्ही हिंदू आहात हे विसरु नका, या एका फोनमुळे अमित शाहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
गुजरात दंगल प्रकरणात संकटात असताना बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह यांना वाचवलं. अमित शाह यांच्यावर तडीपारची कारवाईही झाली होती, पण त्यावेळी बाळासाहेबांच्या एका फोनवर अमित शाह यांना संकटातून बाहेर काढलं. आता अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली? असा सवालही संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केलायं.