गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या (Maharashtra Politics) आहेत. याबाबत खुद्द शरद पवारांनी देखील आपण निर्णय प्रक्रियेपासून बाजूला झाल्याचे सांगत एक प्रकारे या चर्चेला दुजोराच दिला आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्ते अन नेते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात, अशा भावना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्याने डेक्कन चौकातील बॅनरवर व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे. उद्या (बुधवार) या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गट यांची कार्यकारणी बैठक मुंबईत होत आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. या बैठकीत विलनीकरणावर समर्थन आणि विरोध करणारे अशा दोन्ही बाजूचे नेते कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
कुटुंब म्हणून पवार एकत्र येत असले तरी वेगळे झालेले दोन पक्ष आणि यामधील कार्यकर्त्यांचे मन मात्र दुभंगलेले आहेत. त्यामुळे कुटुंब म्हणून अजित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे एकत्र येत असले तरी काही नेत्यांची मात्र कमालीची अडचण झाली आहे. काहींनी तर आपलं भविष्यातील राजकारण सेट करण्यासाठी धाडसी निर्णय घेतले होते मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. याच भीतीपोटी विलीनीकरणाच्या चर्चेवर विरोध करणारा एक मोठा वर्ग आहे तर आपलं राजकारण सोपं होईल यासाठी विलनीकरण आवश्यक असल्याचं मानणारा देखील एक मोठा वर्ग दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतो.
दरम्यान, उद्या होणाऱ्या कार्यकारणी बैठकीमध्ये हा मुद्दा नक्कीच चर्चिला जाईल आणि यामध्ये कोण कुठल्या बाजूला आहे हे समजेल. मात्र तुर्तास तरी बॅनर्स सोशल मीडिया यावरून तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेते आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
Maharashtra Politics ..अन् काही वेळातच बॅनर काढला
पुण्यातील डेक्कन चौकात लावलेला बॅनर काही वेळानंतर काढून टाकण्यात आला आहे. हा बॅनर राष्ट्रवादी शरद पवार गट कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांच्याकडून लावण्यात आला होता. या बॅनरवर सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याची अधिकार तुमच्यावर सोडले आहेत.लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात आपण सगळेजण एकत्र येण्याची संपूर्ण महाराष्ट्र खूप आतुरतेने वाट पाहत आहेत, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांमध्ये जरी एकत्र होण्याची चर्चा सुरू झाली असली तरी हे दोन पक्ष सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे या दोघांनीही हा निर्णय घेण्याआधी आपल्या मित्र पक्षांशी चर्चा केली आहे का? आणि केली असेल तर त्यांना हा निर्णय मान्य आहे का? हे देखील पहावं लागणार आहे. शिवाय महायुतीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला घेण्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे नेते कार्यकर्ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे विलनीकरणाची चर्चाच होते की प्रत्यक्षात काही निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.