भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या हवाई धुमश्चक्री सुरू (India Pakistan War) आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांशी फोनवर चर्चा केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रुबियो यांनी दोन्ही देशांमधील (भारत-पाकिस्तान) सुरू असलेल्या तणावाबाबत लष्करप्रमुखांशी चर्चा केली आहे. पाकिस्तान ज्या कुरापती करत आहे, त्याने अमेरिका नाराज आहे आणि मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला भारतासोबतचा तणाव कमी करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांऐवजी पाकिस्तानी लष्करप्रमुखांशी चर्चा केली आहे. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट संदेश देण्यासारखे आहे की अशा तणावपूर्ण वातावरणात, अमेरिका पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या सरकारपेक्षा जास्त महत्त्वाचे मानत आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली आहे. ही पाकिस्तानी लष्कर आणि सरकारची सर्वोच्च समिती आहे, जी मोठे निर्णय घेते. ही समिती अणुबॉम्बच्या वापराबाबतही निर्णय घेते. नॅशनल कमांड ऑथॉरिटीमध्ये पाकिस्तान सरकारमधील उच्चपदस्थ लोकांचा समावेश असतो.
पाकिस्तान सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी सकाळी पाकिस्तानने ड्रोनने भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने हे सर्व ड्रोन पाडले.
दुसरीकडे, भारताने प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे तीन हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारताने लक्ष्य केलेल्या हवाई तळांमध्ये नूर खान, शोरकोट आणि मुरीद हवाई तळांचा समावेश आहे. भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे की ते पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देणार आहेत.
भारताने प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानातील गोलबीर येथे मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्याची ओळख राज कुमार थाप्पा अशी झाली आहे. थाप्पा हे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तपद भूषवत होते. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, हल्ल्याच्या काही तास आधी राज कुमार थापा यांनी त्यांच्याशी ऑनलाइन बैठकीत चर्चा केली होती.