17.8 C
New York

Ind vs pak war : पाकिस्तानविरुद्धची कारवाई देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक, आरएसएसची स्पष्ट भूमिका

Published:

पहलगाम हल्ल्यानंतर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांवर (Ind vs pak war) केलेल्या निर्णायक ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) केंद्र सरकार आणि संरक्षण दलांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर तसेच त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थक यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल आहे, असे आमचे मत असल्याचे आरएसएसने म्हटले आहे.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी एका स्थानिकासह 25 पर्यटकांची हत्या केली. याला प्रत्युतत्र म्हणून 6 मे रोजीच्या मध्यरात्रीनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार केल्याने 16 भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला. शिवाय, पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, पण भारतीय लष्कराने हे हल्ले परतवून लावले. तर, सर्वसामान्यांना लक्ष्य करण्यात आल्याने भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरू केले आहेत.

या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. हिंदू पर्याटकांच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढले आहे, असे सांगून मोहन भागवत म्हणाले की, राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश तन, मन आणि धनाने सरकार तसेच सशस्त्र दलांसोबत उभा आहे.

पाकिस्तानी सैन्याने भारतीय सीमेवरील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्यांवर केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच, या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही शोकसंवेदना व्यक्त करतो, असे सांगून त्यांनी म्हटले आहे की, या आव्हानात्मक प्रसंगी, सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सर्व देशवासीयांना करत आहोत. त्याचबरोबर, आपले नागरी कर्तव्य बजावताना, सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होणार नाही, याची काळजीही आपण घेतली पाहिजे, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img