विवेक फणसळकर मुंबईचे पोलीस आयुक्त (New Mumbai CP) आज, 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर पुढचा पोलीस आयुक्त कोण होणार? याची चर्चा आधीपासूनच सुरू झाली होती. सेवाज्येष्ठतानुसार सहाजण या स्पर्धेत होते. मात्र, आधीच्या पाच जणांना डावलून आयपीएस अधिकारी देवेन भारती यांचे नाव या पदासाठी निश्चित झाल्यामुळे या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विवेक फणसळकर यांच्याप्रमाणेच देवेन भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. या महत्त्वाच्या पदासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्या दृष्टीने विश्वासू तसेच सेवाज्येष्ठता हे निकष महत्त्वाचे होते. (Deven Bharti is the new Mumbai Police Commissioner)
विवेक फणसळकर गेल्या 30 जून 2022 रोजी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती यांचा पोलीस दलातील सेवेचा आज, बुधवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे 1990च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजयकुमार वर्मा, सदानंद दाते आणि बिपिनकुमार सिंह हे डीजी दर्जाचे अधिकारी तसेच, 1992च्या बॅचचे रितेश कुमार यांची नावे मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी चर्चेत होती. याशिवाय, ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 1993 बॅचच्या अधिकारी अर्चना त्यागी यादेखील आयुक्तपदाच्या दावेदार मानल्या जात होत्या. त्यांच्यावरच ‘मर्दानी’ हा बॉलिवूड चित्रपट आधारित होता. अभिनेत्री राणी मुखर्जीने त्या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
तथापि, 1990, 1992 आणि 1993 अशा बँचचे पाच अधिकाऱ्यांमध्ये चुरस रंगलेली असतानाच 1994च्या बॅचचे देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे पद खास मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेन भारती यांच्यासाठीच तयार करण्यात आले होते. मात्र, विवेक फणसाळकर निवृत्त होत असल्याने आयुक्तपद पुन्हा पदावनत करून ते पुन्हा अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन 2014 ते 2019 या काळात देवेन भारती यांना सर्वात पॉवरफूल अधिकारी मानले जात होते. त्यावेळी ते मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपदी अशा महत्त्वाच्याच पदांवर कार्यरत होते. जानेवारी 2023मध्ये त्यांच्यासाठी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करण्यात आली होती.