वांद्रे (पश्चिम) येथील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरुममध्ये (Bandra fire) मंगळवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत शोरूम जळून खाक झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. (Chroma Showroom gutted in Bandra fire)
प्राप्त माहितीनुसार, वांद्रे (पश्चिम) येथील प्रसिद्ध लिंक स्क्वेअर मॉलच्या बेसमेन्टमध्ये असलेल्या क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. या शोरूममध्ये अधिकतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने अल्पावधीतच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे कार्य हाती घेतले. प्रारंभी पहाटे 4.17 वाजता आग स्तर-1ची होती. मात्र अवघ्या 11 मिनिटात म्हणजे पहाटे 4.28 वाजता आग आणखीन भडकल्याने आगीचा स्तर-2 झाल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. त्यानंतर आणखीन 21 मिनिटांत आग भीषण झाल्याने पहाटे 4.49 वाजता आगीचा स्तर-3 झाल्याचे आणि नंतर 1 तास 36 मिनिटांनी आग आणखी वाढल्याने सकाळी 6.25 वाजता आगीचा स्तर-4 झाल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले.
आगीचा धूर संपूर्ण मॉलमध्ये पसरला होता. सुदैवाने त्यावेळी शोरुम आणि मॉल बंद होता, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. अग्निशमन दलाने आगीची भीषणता पाहता आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन आणि 9 जंबो वॉटर टँकर घटनास्थळी नेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर सकाळी 7.50 वाजता एनडीआरएफच्या टीमला मदतीसाठी घटस्थळी पाचारण करण्यात आले. सकाळी 8.30 वाजल्यानंतर आग काहीशी आटोक्यात आली.