काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृतांमध्ये या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील इतर पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. टप्प्याटप्प्यात या पर्यटक स्वगृही दाखल होत आहेत. पण त्याचवेळी राज्याचे दोन प्रमुख मंत्री तिथे पोहोचले आहेत. त्यावरून त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. (Sushma Andhare targets Shinde over politics of taking credit)
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले या तिघांचा तसेच पनवेलच्या दिलीप देसले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेले पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर उर्वरित पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविली आहे. त्यानुसार ते श्रीनगरमध्ये दाखलही झाले. पण त्याचबरोबर शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही तिथे पोहोचले.
एकनाथ शिंदे यांना यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लक्ष्य केले आहे. पहलगाममधील घटनेने सर्व देश हादरला आहे. हा दहशतवादी हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावर झाला आहे. या हल्ल्यात जे मृत झाले आहेत. त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरूच आहे. त्यांना जणू मृत्यूचा सोहळा साजरा करावासा वाटत आहे. एकनाथ शिंदे यांचा जो व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पार्श्वसंगीत म्हणून वेगवेगळी गाणी ऐकायला मिळतात. यातून हेच स्पष्ट होते की, ही मंडळी तिथे कोणाचे दु:ख वाटून घेण्यासाठी गेलेली नाहीत. फक्त चमकोगिरी करायला गेली आहेत. वास्तवात, त्यांनी तिथे जाण्याची गरज नाही. कारण आधीच तिथे लष्करावर ताण आहे आणि तो ताण वाढवून तुम्ही असे काय करणार आहात? असा सवालही त्यांनी केला आहे.
Pahalgam Terror Attack संजय राऊतांची टीका
यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही टीका केली आहे. सरकार म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांना जम्मू काश्मीरमध्ये पाठवले असल्याने तिथे अन्य कोणी जाण्याची गरज नाही. या दु:खद प्रसंगी महायुती सरकारमधील घटक पक्ष कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचे हसं करत आहे. एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवत आहेत का? की, एकनाथ शिंदे फडणवीस यांचे ऐकायला तयार नाहीत? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.