(IPL) २०२५ च्या १८व्या हंगामात एक अनोख तांत्रिक कल्पना सादर करण्यात आली आहे.ती ती म्हणजे (Robotic Dog) रोबोटिक डॉग. हा रोबोटिक डॉग आयपीएलच्या प्रसारण आणि मनोरंजनाचा अनुभव नव्या उंचीवर घेऊन जात आहे. हा एक चार पायांचा रोबोट आहे, जो खऱ्या कुत्र्यासारखा दिसतो आणि त्याच्यासारखी हालचाल करतो. या डॉगच्या पाठीवर उच्च-गुणवत्तेचा कॅमेरा बसवलेला आहे, जो मैदानाच्या विविध भागातून चित्रीकरण करतो. या रोबोटिक डॉगला आवाजाद्वारे सूचना दिल्या जाऊ शकतात, जसे की कॅमेराला हलवणे किंवा विशिष्ट हालचाल करणे. खेळाडू आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी याची रचना केली आहे, १३ एप्रिल २०२५ रोजी दिल्ली येथे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी या रोबोटिक डॉगची ओळख क्रिकेट चाहत्यांना करून देण्यात आली. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि अँकर डॅनी मॉरिसन याने आयपीएलच्या सोशल मीडिया हँडलवरून अधिकृतपणे एका खास व्हिडिओद्वारे या रोबोटची ओळख करून दिली.
या व्हिडिओमध्ये डॅनी मॉरिसनने आपल्या खास शैलीत रोबोटिक डॉगच्या वैशिष्ट्यांचा उलगडा केला. त्याने रोबोटिक डॉगसोबत धावण्याची शर्यतही लावली, त्याचा तो विडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. ज्यात रोबोटने त्याला सहज मागे टाकले. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. सामन्यापूर्वी टॉससाठी वापरण्यात येणारे नाणे कर्णधारांपर्यंत पोहोचवण्याचे कामही हा रोबोट करतो. याचा वापर मैदानावरील सुरक्षेसाठीही केला जात आहे, जसे की संशयास्पद हालचाली टिपणे. ज्यामुळे आयपीएलचा अनुभव अधिक रोचक होताना दिसत आहे. या रोबोटिक डॉगची बाजारातील किंमत सुमारे ३. ५ लाख ते ४. ५ लाख रुपये आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे आयपीएलचा हा हंगाम अधिक लक्षवेधी ठरत आहे. आयपीएल २०२५ मधील रोबोटिक डॉग हि केवळ एक तांत्रिक कल्पना नाही, तर क्रिकेटच्या अनुभवाला नवीन रंग देणारा प्रयोग आहे. धोनी, हार्दिक, अक्षर यांसारख्या खेळाडूंसोबतच्या त्याच्या खेळकर संवादाने आणि अनोख्या चित्रीकरणाने चाहत्यांचे मन जिंकले आहे. येत्या सामन्यांमध्ये हा रोबोट आणखी काय कमाल करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.