देशभरात क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. वीज बिल, पाण्याचं बिल भरायच असेल किंवा काही शॉपिंग करायची असेल तर क्रेडिट कार्डचाच (Credit Card) वापर केला जातो. याच कारणामुळे क्रेडिट कार्डच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या (Reserve Bank of India) अहवालाने या क्रेडिट कार्ड संदर्भात मोठी माहिती समोर आणली आहे.
Credit Card किती वाढले क्रेडिट कार्ड?
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2019 मध्ये 5.53 कोटी क्रेडिट कार्ड वापरात होते. डिसेंबर 2024 पर्यंत कार्डची संख्या दुप्पट होऊन 10.80 कोटींपर्यंत पोहोचली. दुसरीकडे डेबिट कार्डचा (Debit Card) वापर मात्र स्थिर राहिला. 2024 या वर्षात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 20.37 लाख कोटी रुपयांचे 447.23 कोटी पेमेंट ट्रांजॅक्शन झाले. याच कालावधीत डेबिट कार्डच्या माध्यमातून 173.90 कोटी पेमेंट व्यवहार झाले. ज्यांचे मूल्य 5.16 लाख कोटी रुपये होते.
Credit Card दरवर्षी 15 टक्क्यांची वाढ
आरबीआय रिपोर्टनुसार अलीकडील वर्षात दरवर्षी क्रेडिट कार्डच्या संख्येत सरासरी 15 टक्के वाढ झाली आहे. याच काळात डेबिट कार्डच्या वापरात मात्र घट झाली आहे. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दोन्हींचा विचार केला तर देशभरात 109.9 कोटी कार्ड वापरात आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे क्रेडिट कार्ड डिसेंबर 2019 पर्यंत 122.6 लाखांवरून डिसेंबर 2024 पर्यंत 257.61 लाख झाले. जवळपास 110 टक्क्यांची ही वाढ आहे.
डिसेंबर 2024 पर्यंत खासगी क्षेत्रातील बँकांकडे क्रेडिट कार्ड मार्केट मध्ये 71 टक्के हिस्सेदारी होती. या बँकांनी शहरी आणि संपन्न ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल समाधान आणि को ब्रँडेड कार्ड स्वीकारले. को ब्रँडेड कार्ड म्हणजे एखादी बँक चर्चेत असणारे फ्लिपकार्ट, अमेझॉन यांसारख्या कंपन्यांना सोबत घेत कार्ड लाँच करतात. या कार्डद्वारे संबंधित कंपन्याकडे शॉपिंग केल्यानंतर अतिरिक्त सूट मिळते.
Credit Card विदेशी बँकांचे कार्ड घटले
विदेशी बँकांच्या क्रेडिट कार्डच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षांच्या काळात या बँकांचे क्रेडिट कार्ड 65.79 लाखांवरून 45.94 लाखांपर्यंत कमी झाले. डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2024 या काळात त्यांची बाजारातील हिस्सेदारी 11.9 टक्क्यांवरून 4.3 टक्क्यांवर आली आहे. विदेशी बँकांकडून जास्त शुल्क आकारणी आणि कठोर टॅक्स पॉलिसी ही करणे यामागे आहेत. लहान वित्तीय बँकांनी सुद्धा क्रेडिट कार्ड सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. या बँकांनी डिसेंबर 2024 पर्यंत 10.97 लाख कार्ड जारी केले आहेत.